राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांच्या झारखंडमधील एका कार्यक्रमादरम्यान, कार्यकर्त्यांच्या दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचे वृत्त आहे. भागवत कार्यक्रम स्थळावरुन निघून गेल्यानंतर ही हाणामारी झाल्याचे कळते.

सुत्रांच्या माहितीनुसार, झारखंडमधील धनबाद येथे रविवारी क्रीडा भारतीच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्यासोबत यावेळी मुख्यमंत्री रघुबरदास हे देखील उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर जसे हे दोघेही निघून गेले त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये काही कारणास्तव वाद झाला. या वादाचे पर्यावसन नंतर तुंबळ हाणामारीत झाले. यावेळी एकमेकांना शिव्यांची लाखोली आणि लाथा-बुक्यांनी मारहाण करण्यात आली.

स्थानिक माध्यमांतील वृत्तानुसार, भागवत ज्या गाडीतून आले होते. त्या ड्रायव्हरसोबत इतर कार्यकर्त्यांचा काही कारणाने वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की तो थेट गुद्द्यांवर आला. मात्र, अद्यापही या मारहाणीचे कारण स्पष्ट झाले नाही.

या घटनेपूर्वी कार्यक्रम शांततेत पार पाडला आणि भागवत तसेच मुख्यंमत्री घटनास्थळावरुन निघून गेले होते. दरम्यान, कार्यक्रमात बोलताना भागवत यांनी शिक्षणाला धर्मासोबत जोडायला हवे अशी भुमिका मांडली. त्यांनी धर्म आणि शिक्षण हे एकमेकांना पुरक असल्याचे म्हटले. यावेळी त्यांनी शिक्षणाच्या बाजारीकरणावर चिंता व्यक्त केली. शिक्षणाच्या बाजारात आता ३ हजार अरब डॉलर इतकी उलाढाल होत असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, भागवत यांच्या कार्यक्रमानंतर झालेला हाणामारीचा प्रकार एक चिंतेचा विषय बनला आहे. कारण, काही दिवसांपूर्वीच सुरक्षा एजन्सीजने त्यांच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले होते. सुरक्षा एजन्सीजने आरएसएस प्रमुखांची सुरक्षा व्यवस्था राष्ट्रीय सुरक्षा गार्डच्या (एनएसजी) कमांडोजमध्ये अपग्रेड करण्याची शिफारस केली होती. मात्र, अद्याप त्यांना झेड प्लस सुरक्षा व्यवस्थाच देण्यात येत आहे.