करोनाविरोधातील सूचनांबद्दल समाधान

नवी दिल्ली : करोनाविरुद्धच्या लढय़ात परिणामकारक हस्तक्षेप करून अनेकांचे प्राण वाचविल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची स्तुती करणारे पत्र केरळमधील लिडविना जोसेफ या इयत्ता पाचवीतील लहानगीने सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांना पाठविले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच लसीकरण धोरणावर टीका केल्याने केंद्र सरकारने १८ वर्षांवरील सर्वाना विनामूल्य लस देण्याचे जाहीर केले अशी टीका सुरू असतानाच या लहानगीने हे पत्र पाठविले आहे.

जोसेफ ही थ्रिसूरमधील केंद्रीय विद्यालयाची विद्यार्थिनी असून तिने पत्रासमवेत एक चित्रही पाठविले आहे. त्यामध्ये न्यायाधीश करोनाचा नाश करीत आहेत असे चित्र रेखाटण्यात आले आहे, त्याचबरोबर तिरंगा आणि सुहास्य वदनातील म. गांधीजींचे चित्रही आहे.

करोनामुळे दिल्लीत आणि देशाच्या अनेक भागांमध्ये अनेकांना प्राण गमवावे लागले. त्यामुळे आपण काळजीत होतो, मात्र न्यायालयाने परिणामकारक हस्तक्षेप केल्याचे आपल्याला वृत्तपत्रांमधून समजले, असे पत्रामध्ये म्हटले आहे.

न्यायालयाने प्राणवायूच्या पुरवठय़ाबाबत आदेश दिले आणि अनेकांचे प्राण वाचविले हे पाहून आपल्याला आनंद झाला आणि अभिमानही वाटला आणि त्यासाठी आपले आभार मानते, असेही तिने पत्राच्या अखेरीस लिहिले आहे. सरन्यायाधीशांनीही जोसेफ हिला पत्रोत्तर पाठविले असून तिला शुभेच्छा दिल्या आहेत.