मध्य प्रदेशातील मोरेना येथील घटना

मोरेना (मध्य प्रदेश)  मध्य प्रदेशातील मोरेना येथे इयत्ता १२ वीत शिकणाऱ्या १९ वर्षीय विद्यार्थिनीची दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही विद्यार्थिनी पोसरा शहरातील शिकवणी वर्ग आटोपून आपल्या घरी परतत असताना ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

बुधवारी सायंकाळी हा प्रकार घडल्यानंतर या विद्यार्थिनीचे नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांनी निदर्शने केली आणि पोलिसांच्या गाडय़ांवर दगडफेक केली. या विद्यार्थिनीचे नाव अंजली राठोड असे असून तिच्यावर अनेक गोळ्या झाडण्यात आल्या. ती आपल्या मैत्रीणीसमवेत परतत असताना जोताई मार्गावर ही घटना घडली.

गोळ्या झाडण्यात आल्यानंतर तिला तातडीने स्थानिक सरकारी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. या घटनेनंतर या विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी आणि स्थानिक नागरिकांनी निदर्शने केली, त्यानंतर दगडफेकही करण्यात आली त्यामध्ये पोलिसांच्या गाडीचे नुकसान झाले.

विद्यार्थिनीची हत्या करणाऱ्या तीन आरोपींची ओळख पटली असून त्यांचा कसून शोध घेतला जात आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.