प्लास्टिकला पर्याय म्हणून आता रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर सुरू होणार आहे. पंधरा वर्षांपूर्वी तत्कालीन रेल्वे मंत्री लालूप्रसाद यादव यांनी कुल्हडचा (चहा पिण्याचे मातीचे भांडे) वापर सुरू केला होता. त्यानंतर काही काळ हा वापर बंद होता. आता रेल्वेच्या खानपानगृहात कुल्हडचा वापर सुरू केला जाणार आहे. रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी वाराणसी व रायबरेली स्टेशनवरील खानपान सेवादारांना टेराकोटाचे कुल्हड वापरण्याच्या सूचना केल्या आहेत. काचेची भांडी व प्लेट वापरण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. रेल्वे मंडळाने उत्तर रेल्वे व ईशान्य रेल्वेच्या व्यापार व्यवस्थापकांना तशी परिपत्रके पाठवली आहेत. यातून ग्राहकांना एक वेगळा अनुभव तर येईल शिवाय स्थानिक कुंभारांना काम मिळेल, असे सांगण्यात आले. विभागीय रेल्वे व आयआरसीटीसी यांना स्थानिक उत्पादने वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या असून टेरा कोटाचे कुल्हड, काचेची भांडी व ताटे वापरण्यास सांगण्यात आले आहे. स्थानिक टेराकोटा उत्पादकांना त्यामुळे फायदा होणार आहे.

कुंभारांचे आर्थिक सक्षमीकरण

या दोन स्थानकांवर कुल्हडचा वापर केला तर रोजची मागणी २.५ लाख होईल असे त्यांचे म्हणणे आहे. कुंभार सशक्तीकरण योजनेत सरकारने त्यांना विद्युत चाके देण्याचे ठरवले आहे. पंतप्रधानांच्या वाराणसी मतदारसंघात तीनशे विद्युत चाके देण्यात आली असून ती १००० पर्यंत देण्याचा विचार आहे. रायबरेली हा सोनिया गांधी यांचा मतदारसंघ असून तेथे १०० विद्युत चाके देण्यात आली असून आणखी ७०० दिली जाणार आहेत.