हरयाणातील भूखंडासंदर्भात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा आणि डीएलएफ कंपनीच्या दरम्यान झालेल्या व्यवहारात अनियमितता असल्याचा आरोप चुकीचा आहे असे पंतप्रधान कार्यालयाने बुधवारी अलाहाबाद उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट केले.  
हरयाणातील चार जिल्ह्य़ांमधील भूखंड डीएलएफ कंपनीला बाजारभावापेक्षा कमी दराने विकल्याचा आरोप वढेरा यांच्यावर अरविंद केजरीवाल यांनी केला होता. या पाश्र्वभूमीवर लखनऊतील नूतन ठाकूर या सामाजिक कार्यकर्त्यांने अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करत या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली होती. त्या प्रकरणी लखनऊ खंडपीठासमोर बुधवारी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात पंतप्रधान कार्यालयाने वढेरांचा बचाव केला. प्रसारमाध्यमांमधील बातम्यांवर आधारित करण्यात आलेले हे आरोप खोटे असूून डीएलएफ व वढेरा यांनी त्याचा आधीच इन्कार केला असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे.