रशियातील विरोधी नेते अ‍ॅलेक्सी नवाल्नी यांना सोविएत काळात उपलब्ध असलेले नोविचोक हे विष देऊन त्यांच्यावर विषप्रयोग करण्यात आला, अशी माहिती जर्मनीच्या सरकारने सोमवारी दिली आहे.

जर्मनीच्या लष्करी प्रयोगशाळेने सांगितले की, त्यांच्या नमुन्यात नोविचोक हा विषारी पदार्थ सापडला आहे. जर्मन सरकारचे प्रवक्ते स्टीफन सीबर्ट यांनी म्हटल्यानुसार हेग येथील रासायनिक शस्त्रे प्रतिबंध संघटनेलाही नमुने पाठवण्यात आले असून त्यांनी केलेल्या चाचण्यांतही तो पदार्थ नोविचोक गटातील असल्याचे म्हटले आहे.  जर्मनीने आता फ्रान्स व स्वीडन यांना जर्मनीच्या निष्कर्षांचा तटस्थ आढावा घेण्यास सांगितले असून त्यासाठी नमुने पाठवण्यात आले आहेत.

नवाल्नी हे रशियातील पुतिन यांच्या विरोधात उभे ठाकलेले नेते असून विषप्रयोगाने आजारी पडल्यानंतर त्यांना २० ऑगस्टला उपचारासाठी जर्मनीत नेण्यात आले होते. रशियाने या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी जर्मनीने केली होती. रशियाने या विषप्रयोगाबाबत स्पष्टीकरण करावे अशी मागणी सिबर्ट यांनी सोमवारी पुन्हा केली आहे. युरोपीय समुदायातील देशांशी आम्ही पुढील कारवाईबाबत संपर्कात आहोत असे त्यांनी स्पष्ट केले. रशियाने यात हात असल्याचा इन्कार केला असून रशियाला पाश्चिमात्य देश बदनाम करीत आहेत असा पलटवार केला आहे. नवाल्नी यांना घातलेले विष नोविचोक रसायन गटातील होते याचे जर्मनीने पुरावे द्यावेत असे रशियन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. २०१८ मध्ये ब्रिटनमधील सॅलिसबरी येथे  रशियन माजी गुप्तहेर सर्जेई स्क्रिपाल व त्यांच्या मुलीवर रशियाने असाच विषप्रयोग केला होता. नवाल्नी यांना जर्मनीत अतिदक्षता विभागात ठेवले असून त्यांच्या विषावर उतारा देण्याचे काम सुरू होते. नंतर त्यांची प्रकृती सुधारली आहे.