News Flash

हवामानातील १९५० नंतरचे बदल गेल्या १४०० वर्षांतील सर्वात तीव्र

जगात गेल्या १४०० वर्षांत झालेल्या हवामानबदलांच्या तुलनेत गेल्या साठ वर्षांमध्ये (१९५० सालानंतर) हवामानात झालेले बदल अधिक तीव्र असल्याचे इंटरगव्हर्नमेंटल

| September 28, 2013 04:28 am

जगात गेल्या १४०० वर्षांत झालेल्या हवामानबदलांच्या तुलनेत गेल्या साठ वर्षांमध्ये (१९५० सालानंतर) हवामानात झालेले बदल अधिक तीव्र असल्याचे इंटरगव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी) या संघटनेच्या पाचव्या अहवालात स्पष्ट करण्यात आले. जागतिक तापमानवाढीला माणसाची कृती कारणीभूत असल्याचे या अहवालाद्वारे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. हा अहवाल शुक्रवारी येथे जाहीर करण्यात आला.
आयपीसीसीतर्फे दर काही वर्षांनंतर हवामानबदल विषयक स्थितीदर्शक अहवाल प्रसिद्ध केला जातो. यापूर्वी २००७ साली असा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला होता. त्या अहवालासाठी आयपीसीसी संघटनेला नोबेल पारितोषक जाहीर करण्यात आले होते. त्यानंतरचा पाचव्या अहवालाचा ३६ पानी सारांश शुक्रवारी माध्यमांसमोर जाहीर करण्यात आला. तो जगभरातील धोरणकर्त्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याचा सविस्तर अहवाल तीन टप्प्यांमध्ये पुढील वर्षभरात प्रसिद्ध केला जाणार आहे. मानवनिर्मित जागतिक तापमानवाढीची शक्यता खूपच अधिक आहे,’ असे या अहवालात म्हटले असून अतिशय कडक शब्द त्यात वापरण्यात आले आहेत. या अहवालानुसार, जागतिक तापमानवाढीला माणसाच्या कृती कारणीभूत असल्याची शक्यता ९५ टक्के असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी २००७ सालच्या अहवालात ही शक्यता ९० टक्के इतकी सांगण्यात आली होती. आयपीसीसीचे सह-अध्यक्ष क्विन दाहे यांनी म्हटले आहे की, आमच्या मूल्यमापनानुसार वातावरण व महासागर यांचे तापमान वाढले आहे. हिम व बर्फ वितळले आहे. त्यामुळे जागतिक सरासरी सागरी जल पातळी वाढली आहे. जागतिक तापमानवाढीला कारणीभूत ठरणाऱ्या हरितगृह वायूंचे सरासरी प्रमाण वाढले आहे. वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण दुपटीने वाढल्यास जागतिक तापमानात १.५ ते ४.५ अंश सेल्सिअस इतकी वोढ होईल, असेही अहवाल म्हणतो.
या अहवालानुसार, गेली तीन दशके ही गेल्या १४०० वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक उष्ण असल्याची शक्यता आहे. गेली तीन दशके ही १८५० च्या दशकानंतर निश्चितपणे उबदार ठरली आहे. १८८० ते २०१२ या काळात जमीन आणि समुद्रांचा पृष्ठभाग यांच्या सरासरी तापमानात तब्बल ०.८५ अंशांनी वाढ झाली आहे. जगभरातील समुद्रांच्या तापमानात पृष्ठभागापासून ते तळापर्यंत वाढ झाली आहे. विशेषत: वरचा ७०० मीटरचा भाग हा सर्वाधिक तापला आहे. मात्र, २००० ते ३००० मीटर खोलीच्या पट्टय़ात बदल झाल्यचे ठोस पुरावे मिळालेले नाहीत.
या तापमानवाढीचा बर्फाच्या आवरणावर मोठा परिणाम झाला आहे. १९७१ ते २००९ या काळात दरवर्षी २२६ अब्ज टन इतक्या प्रमाणात बर्फ वितळले आहे. १९०१ ते २०१० या काळात जागतिक समुद्रपातळीत १९ सेंटीमीटरने वाढ झाली आहे. या शतकाच्या अखेपर्यंत आणखी सुमारे २६ ते ८२ सेंटीमीटरची वाढ होण्याची शक्यता या अहवालाद्वारे वर्तवण्यात आली आहे.

अहवाल काय म्हणतो?
१. १९५० नंतर जागतिक तापमानात मोठी वाढ
२. गेली तीन दशके गेल्या १४०० वर्षांच्या तुलनेत अधिक उबदार
३. गेल्या सव्वाशे वर्षांमध्ये जमीन व समुद्र पृष्ठभागाच्या तापमानात ०.८५ अंशांची वाढ
४. समुद्राच्या सर्व खोलींवरील पाण्याच्या तापमानात वाढ; वरच्या ७०० मीटरमध्ये वाढ सर्वाधिक
५. बर्फ वितळण्याचा गेल्या ४० वर्षांतील वेग- वर्षांला २२६ अब्ज टन
६. समुद्राच्या पातळीत या शतकाअखेर २६ ते ८२ सेंटीमीटर वाढ अपेक्षित

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2013 4:28 am

Web Title: climate change after 1950 the most intense in the last 1400 years
टॅग : Climate
Next Stories
1 पाकिस्तानला पुन्हा भूकंपाचा धक्का; दिल्लीतही सौम्य झटके!
2 जम्मूमध्ये घुसले पाच दहशतवादी; शोधमोहिम सुरू
3 बस सहाशे फूट दरीत कोसळली; १९ जणांचा मृत्यू
Just Now!
X