News Flash

माहिती युगातील ज्ञान उपेक्षा

शेतीचा शोध हा स्त्रियांनी लावला व पुढे त्यांनीच शेतीमध्ये सर्जनशील आविष्कार घडवले.

ख्रिस्तिना फिगर्स

सुमारे १२ हजार वर्षांपूर्वी शेतीचा शोध लागला असावा असं इतिहासकार मानतात. भटके मानवी जीवन शेतीमुळे स्थिर झाले. पशुपालन, अनेक प्रकारच्या धान्यांमुळे शेतीसंस्कृती विकसित होत गेली. शेतीचा शोध हा स्त्रियांनी लावला व पुढे त्यांनीच शेतीमध्ये सर्जनशील आविष्कार घडवले. स्त्री म्हणजे निर्मिती हे सूत्र तेव्हाच तयार झाले असावे. (‘स्त्री ही कर्ती धर्ती प्रकृती असून पुरुष हा केवळ निमित्तमात्र आहे.’ हा सांख्यांचा सिद्धांत हेच सांगतो.) आजही जगभरातील शेतीकामाची जबाबदारी ही स्त्रियांवरच आहे. टुंड्रा प्रदेशापासून अमेझॉनच्या जंगलापर्यंत कुठेही गेले तरी महिलांनाचा शेतीचा भार वाहावा व सहावा लागतो, असे असूनसुद्धा महिलांना विचारात घेतले जात नाही. संयुक्त राष्ट्रसंघाने महिलांकरिता स्वंतत्र संस्था स्थापन करून हवामान परिषदेत विशेष सत्र आयोजित केले होते.
कॅनडामधील आदिवासी (एस्किमो) संघटना प्रमुख श्रीमती माताली ओकालिक म्हणाल्या, ‘हवामान बदलाचा मापक म्हणून उत्तर ध्रुवाकडे (आर्क्टिक) पाहिले जाते. बर्फ आणि बर्फाच्या पाण्यावर शतकांपासून आम्ही उदरनिर्वाह करीत आहोत. आमच्या मातृसत्ताक रीतीने चालत आलेले पारंपरिक ज्ञान व कौशल्यावर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही आम्ही टिच्चून उभे आहोत. हवामान बदलाचा त्रास सहन करत त्याला सामोरे जायलादेखील शिकत आहोत. जुळवून घेणे, समायोजन करणे याकरिता आमच्या स्थानिक ज्ञानाला ओलांडून जाताच येणार नाही. परंतु त्या भागात शेती करणाऱ्या महिलांची हवामान परिषदांमध्ये अजिबात दखल घेतली जात नाही.’
हवामान बदलाचे फटके गरीब देशांना अधिक बसत असून त्या त्या देशातील महिलांची अवस्था शोचनीय होत आहे. ‘आदिवासींकडेच जंगलामधील वनस्पतींचे ज्ञान आहे. त्यांना आहार, आरोग्य व उपजीविकेकरिता जंगलावरच अवलंबून राहावे लागते. स्थानिक बियाणांचे भांडार आमच्याकडेच आहे. विपरीत परिस्थितीत कोणते बियाणे वापरावे, याचा निर्णय आम्हीच घेतो. सरकार वा खासगी कंपन्या कोणाचीही आम्हाला ज्ञानासाठी गरज नाही. आजवर सर्व काळाच्या सगळ्या कसोटय़ांमध्ये आमचे ज्ञान घासूनपुसून निघाले आहे. हा ठेवा ज्ञानयुगात असंख्यांना उपयुक्त ठरू शकतो. याचा विचार धोरणकर्त्यांनी करावा.’ पेरूमधील कार्यकर्त्यां श्रीमती टार्सलिा झिआ यांच्या सखोल व सडेतोड मांडणीचा प्रभाव नंतरही जाणवत राहिला.
केनियामधील आजीच्या गोष्टींमधून ऐकलेल्या भरून वाहणाऱ्या नद्या आता आटू लागल्या आहेत. शुष्क नद्यांबरोबरच जीवनदेखील रखरखीत होत आहे. नेपाळ व दक्षिण आशियामध्ये महापूर, चक्रिवादळ व दुष्काळात महिलांची होलपट होत आहे. सर्व देशांमधील महिलांची परवड सारखीच आहे, हे वृत्तपट व कथनातून जाणवत होते. ‘उत्सवमूर्तीच्या मागे धावणाऱ्या प्रसारमाध्यमांनी महिला व आदिवासी या विषयांना अस्पृश्यच ठरवून टाकले आहे. आमच्या सत्रांची उपस्थिती ही त्याची साक्ष आहे.’ संयुक्त राष्ट्रसंघाने नेमलेल्या निरीक्षक श्रीमती कल्याण राज सांगत होत्या.
आपण तरी आदिवासींचे काय कपाळ कल्याण करतो? भारतामधील आदिवासींचे जीवन साडेनऊ हजार वनस्पतींनी संपन्न आहे. वैज्ञानिक जगतास चार हजार वनस्पतींचे ज्ञान आहे. आदिवासींच्या आहारात चार हजार वनस्पतींचा समावेश असतो, तर आधुनिक विज्ञानानुसार आहारास योग्य वनस्पतींची संख्या बाराशे भरते. आदिवासी साडेसात हजार वनस्पतींचा औषधांसाठी वापर करतात. औषध उद्योगास साडेतीन हजार उपयोगी वनस्पतींची माहिती आहे. आदिवासींनी शतकांपासून ही ज्ञान परंपरा जतन केली नसती, तर काळाच्या ओघात ती नष्ट झाली असती. आपल्या देशात सुमारे नऊ कोटी आदिवासी आहेत. त्यांच्या पारंपरिक ज्ञानाचा उपयोग न होणे हा करंटेपणा आहे.
आदिवासींना बाजारपेठ माहीत नाही आणि बाजाराला आदिवासींच्या वनस्पती ज्ञानाचे भान नाही. राष्ट्राच्या उत्पन्नात भरभक्कम वाढ करण्याची क्षमता उद्योग क्षेत्रापेक्षा भारतीय वनस्पती सृष्टीत आहे. सध्या जगाच्या बाजारात वनौषधींना जबरदस्त मागणी आहे. दोन लक्ष कोटी रुपयांच्या बाजारपेठेतही चीनचे वर्चस्व आहे. (हा चिनी डंका इथेही वाजत आहे) तब्बल साठ टक्के वाटा त्यांचा असून जपानचा वीस टक्के,
रशियाचा चौदा टक्के आहे. आपली क्षमता असूनही आपला हिस्सा केवळ सहा टक्के आहे. ज्ञानाचा आदर तर दूरच त्यांना त्यांच्या स्थानावरून हुसकावून लावत आपली हानी किती होत आहे? या धाटणीतून ‘भारत निर्माण’ कसे होणार?
कोस्टा रिकाच्या मुत्सद्दी, मानववंशशास्त्र व अर्थशास्त्र विषयाच्या अधिकारी श्रीमती ख्रिस्तिना फिगर्स ह्य़ा गेल्या पाच वर्षांपासून हवामान बदल परिषदेच्या महासचिवपदाची धुरा सांभाळत आहेत. ‘महिलांच्या सहभागानंतरच जगाच्या इतिहासातील अनेक महत्त्वपूर्ण बदल घडून आले आहेत. आमची पिढी ही सर्व प्रकाराचे असंतुलन सहन करणारी अखेरची ठरावी. यासाठी आपण झटू या,’ असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
अतुल देऊळगावकर , लबोर्जे, पॅरिस

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2015 2:20 am

Web Title: climate change hit more to poor countries
Next Stories
1 ‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक
2 लोकसभा अधिवेशन : आजही संसद दणाणणार !
3 आजचे संकट उद्यावर!
Just Now!
X