हिमाचल प्रदेशातील लाहौल खोऱ्यात भारतीय वायुसेनेचे एएन-१२ हे विमान ५० वर्षांपूर्वी अपघातग्रस्त झाले होते. या विमानातील एका सैनिकाचे शव ५० वर्षांनी सापडले आहे. गिर्यारोहण करणाऱ्या काही गिर्यारोहकांना या सैनिकाचे शव आणि विमानाचे काही अवशेष मिळाले आहे. या विमानात १०२ प्रवासी होते आणि हे विमान चंदीगढ येथून लेह या ठिकाणी चालले होते. गिर्यारोहकांच्या एका पथकाने या संदर्भातला शोध लावला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

गिर्यारोहकांचा एक समूह १ जुलै रोजी चंद्रभागा-१३ जवळच्या एका शिखराची सफाई करत असताना या विमानाचे अवशेष सापडले आहेत. हे अवशेष ढाका ग्लेशियर बेस शिबीराजवळ सापडले आहेत. हे अवशेष जिथे सापडले ती उंची समुद्र सपाटीपासून ६ हजार २०० मीटर इतकी आहे. आम्हाला आधी विमानाचे काही अवशेष सापडले. त्यानंतर आमच्या चमूतील सदस्यांना काही मीटर अंतरावर एका सैनिकाचे शव आढळले अशी माहिती टीम लीडर राजीव रावतने दिली.

अपघातग्रस्त विमानाचे अवशेष आणि सैनिकाचे शव मिळाल्यानंतर आमच्या पथकाने त्याचे फोटो काढले आणि सेनेच्या हाय ऑल्टिट्यूट वॉर स्कूलला ते पाठवले. त्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांनी विमानाचे हे अवशेष आणि सैनिकाचा मृतदेह नेमका कधीचा असेल याचा शोध घेण्यास सुरूवात केली. त्यावेळी हा अपघात ५० वर्षांपूर्वी झाल्याची माहिती समोर आली. अपघातग्रस्त विमान ७ फेब्रुवारी १९६८ ला गायब झाल्याची माहिती समोर आली आहे.