अयोध्येत राम मंदिराच्या कामाला प्रत्यक्षात सुरू झाली नसली, तरीही लोकांकडून मंदिराच्या ट्रस्टला मोठ्या प्रमाणात देणग्या मिळत आहे. मात्र, देणग्या स्वीकारण्यासाठी उघडण्यात आलेल्या ट्रस्टच्या बँक खात्यातूनच जमा झालेली रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली समोर आली आहे. फसवणूक करून लाखो रुपये काढण्यात आले. चोरट्यांनी क्लोन चेकचा वापर करून ही रक्कम काढल्याचं वृत्त आहे.

रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या बँक खात्यातून सुमारे सहा लाख रुपये लंपास झाल्याचे प्रकरण बुधवारी उघडकीस आले. लखनौमधील दोन बँकांमध्ये क्लोन चेकचा वापरुन ही रक्कम काढण्यात आली. क्लोन चेक म्हणजे सारख्या दिसणाऱ्या चेकचा वापर करून फसवणूक करणाऱ्यांनी याआधी दोनदा ट्रस्टच्या बँक खात्यातून रक्कम काढली.

तिसऱ्या वेळेस मात्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय याच्या मोबाईलवर रक्कम काढण्यासंदर्भात फोन आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. बॅकेंच्या कर्मचाऱ्यानी रक्कम मोठी असल्याने चंपत राय यांना फोन करून पैसे देण्यासाठी परवानगी मागितली होती.

मंदिराच्या निर्मितीसाठी रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या नावे आतापर्यंत बऱ्याच जणांनी खोटी बॅंक खाती उघडल्याची प्रकरणं समोर आली आहेत. मात्र ट्रस्टच्या खात्यातून पैसे काढण्याचे हे पहिलेच प्रकरण आहे.

कोणतीही सूचना न मिळता हे पैसे काढले गेल्याने ट्रस्टच्या सदस्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अयोध्या पोलिसांनी या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

अयोध्येतील स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेत ट्रस्टचे खातं आहे. चंपत राय आणि ट्रस्टी डॉ. अनिल मिश्र यांच्याकडेच बॅंक खात्याचे सर्व अधिकार आहेत. फसवणूक करणाऱ्यांनी १ सप्टेंबर रोजी पहिल्यांदा लखनौमधून क्लोन चेकद्वारे काही रक्कम पंजाब नॅशनल बॅंकेच्या एका खात्यात जमा केली होती. त्यानंतर ८ सप्टेंबरला पुन्हा पीएनबीच्या खात्यात काही रक्कम जमा केली गेली. एकूण सहा लाख रुपये फसवणूक करून दुसऱ्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.