आपल्या मूळ गावी परत जाऊ पाहणाऱ्या स्थलांतरित मजुरांमार्फत होणारे करोना विषाणूचे संभाव्य सामुदायिक संक्रमण रोखण्याचा प्रयत्न म्हणून देशभरातील राज्ये आणि जिल्ह्य़ांच्या सीमा सील करण्याचा आदेश केंद्र सरकारने रविवारी दिला. तसेच या आदेशाचा भंग करणाऱ्यांना १४ दिवस विलगीकरणात काढावे लागतील असा इशाराही देण्यात आला.

या आदेशानंतरही अनेकांनी महामार्गावरून आपल्या गावाच्या दिशेने प्रवास सुरूच ठेवला. दरम्यान, रविवारी करोनाबाधितांची संख्या १ हजारासमीप पोहचली असून, या रोगाच्या बळींची संख्या २५ झाली आहे.

२१ दिवसांच्या टाळेबंदीच्या पाचव्या दिवशी मोठय़ा शहरांमधून बाहेर जाणारा स्थलांतरित मजुरांचा लोंढा सुरूच राहिला. काम न राहिल्यामुळे हे मजूर आपल्या खेडय़ांकडे परत जाण्यास जिवावर उदार झाले आहेत. त्यांच्यापैकी अनेकजण तर अन्न आणि निवाऱ्यालाही मुकले आहेत.

धमार्थ संघटना, स्वयंसेवक, धार्मिक संस्था आणि रेल्वे सुरक्षा दलासह सरकारी संस्था यांनी देशभरात हजारो लोकांच्या खाण्याची सोय केली, मात्र तरीही अनेकजणांपर्यंत ही सोय पोहचू शकलेली नाही. गेल्या २४ तासांत करोनाबाधितांची संख्या १०६ ने वाढली, तसेच ६ जण मृत्यूमुखी पडले, असे अधिकृत आकडेवारीत म्हटले आहे. दिल्लीहून मध्यप्रदेशातील आपल्या गावाकडे निघालेला एक स्थलांतरित मजूर २०० किलोमीटर चालल्यानंतर हृदयविकाराने रस्त्यातच मरण पावला. राष्ट्रीय राजधानी दिल्ली, महाराष्ट्र आणि केरळ यांसह देशाच्या विविध भागांतून स्थलांतरित मजुरांनी सामूहिकरित्या बाहेर जाणे सुरू केल्यामुळे घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. हजारो लोकांनी मदत शिबिरांबाहेर पडून, आपल्याला घरी जाण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली.

अशा हालचालींमुळे संभाव्य सामुदायिक प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्य आणि जिल्हा सीमा बंद करण्यास सांगितले आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांना १४ दिवसांसाठी विलगीकरण केंद्रांत पाठविण्याचा इशारा दिला.

आदेशात काय?

टाळेबंदी सुरू असताना शहरांमध्ये किंवा महामार्गावर लोकांची अजिबात वाहतूक होणार नाही हे निश्चित करावे, असे निर्देश राज्यांचे मुख्य सचिव व पोलीस महासंचालक यांच्यासोबतच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये कॅबिनेट सचिव राजीव गऊबा व केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी दिले. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यासाठी ‘पार्सल व्हॅन्स’च्या विशेष रेल्वेगाडय़ा चालवण्यात येतील, असे भारतीय रेल्वेने सांगितले आहे.

पंतप्रधानांचा संवाद..

दरम्यान, करोना विषाणूच्या संकटाविरुद्ध भारताच्या लढय़ाची प्रत्यक्ष माहिती घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दररोज दोनशेहून अधिक लोकांशी संपर्क साधत असल्याचे त्यांच्या कार्यालयाने सांगितले. यात राज्यपाल, मुख्यमंत्री व राज्यांचे आरोग्यमंत्री, तसेच देशभरातील डॉक्टर्स, परिचालिका, आरोग्य कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांना दूरध्वनी करण्याचा समावेश आहे.