नागरिकत्व (दुरूस्ती) विधेयक २०१९ च्या विरोधात ईशान्य भारतात विद्यार्थी संघटनांनी पुकारलेल्या बंदला पूर्ण प्रतिसाद मिळाला. अकरा तासांचा हा बंद सकाळी पाच वाजता सुरू झाला. ईशान्य विद्यार्थी संघटनेने (एनईएसओ) पुकारलेल्या बंदला अनेक संघटना व राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला होता.

आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोराम, त्रिपुरात बंदमुळे सुरक्षा वाढवण्यात आली होती. त्रिपुरा बंद काळात एक बाजारपेठ पेटवण्यात आल्याने हिंसक वळण लागले. नागालँडमध्ये हॉर्नबिल महोत्सव सुरू असल्याने त्या राज्याला बंदमधून वगळण्यात आले होते तरी नागा स्टुडंट फेडरेशनने राजभवनसमोर ठिय्या आंदोलन केले. ईशान्येकडील लोकांची ओळख व रोजीरोटी यांना बाधा येत असल्याने या विधेयकाच्या विरोधात बंद पुकारण्यात आला होता.

काँग्रेस,  एसआयईयूडीएफ,ऑल आसाम स्टुडंटस युनियन, कृषक मुक्ती संग्राम समिती, ऑल अरुणाचल प्रदेश स्टुडंट्स युनियन, खासी स्टुडंट्स युनियन व नागा स्टुडंट्स फेडरेशन या संघटनांनी बंदला पाठिंबा दिला होता. गुवाहाटी विद्यापीठ व दिब्रुगड विद्यापीठातील सर्व परीक्षा बंदमुळे रद्द करण्यात आल्या.

मणिपूरमध्ये १५ तासांचा बंद

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात अखिल मणिपूर विद्यार्थी संघटनेने (एएमएसयू) पहाटे ३ ते दुपारी ६ याकाळात १५ तासांचा बंद पाळला. ही संघटना ईशान्य विद्यार्थी संघटनेची सदस्य असून त्यांनी म्हटले आहे की, विधेयक मागे घेतले नाही तर आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. बंदमुळे मणिपूरमध्ये जनजीवन विस्कळीत झाले. दुकाने व व्यापारी आस्थापने बंद होती.

अरुणाचलमध्ये बंद यशस्वी

नागरिकत्व (दुरूस्ती) विधेयक लोकसभेत संमत करण्यात आल्याच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या ईशान्य बंदमुळे अरुणाचल प्रदेशात जनजीवन विस्कळीत झाले. शैक्षणिक संस्था, बँका व व्यापारी आस्थापने तसेच बाजारपेठा बंद होत्या, सार्वजनिक  व खासगी वाहतूकही बंद होती. अखिल भारतीय अरुणाचल प्रदेश विद्यार्थी संघटनेने (एएपीएसयू)मंगळवारी  हा बंद पुकारला होता.

आसाममध्येही बंद

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात आसाममध्ये पुकारण्यात आलेल्या बंद वेळी ब्रह्मपुत्रा खोऱ्यासह सगळीकडे जनजीवन विस्कळीत झाले. विद्यार्थी संघटना व डाव्या  लोकशाही संघटना यांनी बंदची हाक दिली होती. अखिल आसाम विद्यार्थी संघटना  व ईशान्य विद्यार्थी संघटना यांनी एसएफआय, डीवायएफआय, एआयडीडब्ल्यूए, एआयएसफ, एआयएसएफ या संघटनांच्या मदतीने बंद यशस्वी केला.

त्रिपुरात बाजारपेठ पेटवली

आगरतळा : नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात एनइएसओने पुकारलेल्या बंदला त्रिपुरात हिंसक वळण लागले. धलाई जिल्ह्य़ात आदिवासीतर समाजाची दुकाने असेलली बाजारपेठ पेटवून देण्यात आली. यात कुणीही जखमी झाले नाही. मनुघाट बाजारपेठेत ही आग लावण्यात आली. सुरक्षा दले तैनात करूनही बाजारपेठेत घबराट निर्माण झाली. बंदला आदिवासी भागात मिश्र प्रतिसाद मिळाला. धलाई, पश्चिम त्रिपुरा, खोवाई जिल्ह्य़ात जनजीवन विस्कळीत झाले, तेथे लोकांना घराबाहेर न पडणे पसंत केले. कार्यालयांमधील उपस्थिती तुरळक होती. राज्यातील रेल्वे सेवा ठप्प झाली. रस्ते वाहतूकही विस्कळीत झाली. आगरतळा येथे अस्तबल मैदान येथे बंद समर्थकांनी रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला असता ३०० जणांना ताब्यात घेण्यात आले.

चित्रपट महोत्सवातून निर्मात्याची माघार

नागरिकत्व विधेयकाच्या विरोधात राष्ट्रीय पुरस्कार विजेते  चित्रपट निर्माते जाहून बरूआ यांनी त्यांचा ‘भोगा खिरीकी’ (ब्रोकन विंडो) चित्रपट आसाम चित्रपट महोत्सवातून माघारी घेतला आहे. अभिनेत्री प्रियंका चोप्रा या चित्रपटाची निर्माती आहे. सत्तेच्या राजकारणातून राजकीय नेते मातृभूमीचे वस्त्रहरण करीत आहेत अशी टीका करतानाच त्यांनी विधेयकामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नाराजी व्यक्त केली.