नेपाळमध्ये झालेली ढगफुटी आणि तेथे पडलेल्या मुसळधार पावसामुळेच राज्याच्या खेरी आणि बाहरीच जिल्ह्य़ात पूरस्थिती निर्माण झाली असल्याचा दावा उत्तर प्रदेशचे पाटबंधारे मंत्री शिवपाल यादव यांनी रविवारी येथे केला.
हा राष्ट्रीय मुद्दा असून त्यासंबंधी राज्य सरकारने केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे. मात्र राज्यातील पूरसमस्येला तोंड देण्यासाठी केंद्राकडमून काही सहकार्य मिळत नसल्याचा आरोप यादव यांनी केला. गेल्या वर्षी केंद्र सरकारने पाहणी करण्यासाठी तुकडय़ा पाठविल्या, परंतु त्यांच्याकडून अद्याप मदत यावयाची आहे, असे सांगत आता आम्ही नव्याने सर्वेक्षण करू आणि केंद्राकडे मदत मागू, असेही त्यांनी स्पष्ट केले. उत्तर प्रदेशातील पूरस्थिती नियंत्रणाखाली आणण्यासाठी नेपाळमध्ये आवश्यक त्या ठिकाणी मोठे धरण बांधणे आवश्यक आहे, अशीही सूचना यादव यांनी केली.
तत्पूर्वी, यादव यांनी निघसान, धौरेहरा, लखीमपूर आदी पूरग्रस्त भागांचा हवाई दौरा करून शारदानगर येथील शारदा धरणाचीही पाहणी केली.