नासाच्या वैज्ञानिकांचा दावा
गुरूच्या आकाराच्या व तप्त अशा दहा बाह्य़ग्रहांच्या वातावरणाचा वैज्ञानिकांनी अभ्यास केला असून त्या ग्रहांवर अपेक्षेपेक्षा कमी पाणी असण्याची कारणे शोधून काढली आहेत.
नासा व युरोपीय स्पेस एजन्सी यांनी हबल अवकाश दुर्बीण व स्पिटझर दुर्बीण यांच्या मदतीने हे संशोधन करण्यात आले असून त्यात विविध वस्तुमान, तपमान व आकारमान असलेल्या बाह्य़ग्रहांचा तरंगलांबीच्या दृष्टिकोनातून अभ्यास करण्यात आला.
ब्रिटनच्या एक्सेटर विद्यापीठाचे डेव्हीड सिंग यांनी सांगितले, की या बाह्य़ग्रहांचे वातावरण अपेक्षेपेक्षा वैविध्यपूर्ण आहे. सर्व बाह्य़ ग्रहांची कक्षा त्यांच्या मातृताऱ्यापासून अनुकूल अंतरावर असून ते ताऱ्यासमोरून जाताना त्यांचे निरीक्षण पृथ्वीवरून करता येते. ताऱ्याचा काही प्रकाश ग्रहाच्या बाह्य़ वातावरणात पसरतो. तेथील वातावरणाचा ताऱ्याकडून आलेल्या प्रकाशावर परिणाम होतो व हा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचतो, तेव्हा आपण त्या ग्रहाचा अभ्यास करू शकतो असे नासाच्या गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटरचे हना वेकफोर्ड यांनी सांगितले. ताऱ्याच्या प्रकाशावर ग्रहाच्या वातावरणाच्या गुणधर्माचा परिणाम होत असल्याने त्याच्या अभ्यासातून तेथील मूलद्रव्ये कळू शकतात तसेच ढगाळ व ढगमुक्त बाह्य़ग्रह वेगळे सांगता येतात. त्यातूनच तेथे कमी पाणी का आहे याचे रहस्य उलगडते. वैज्ञानिकांनी आतापर्यंत ताऱ्याभोवती फिरणारे दोन हजार ग्रह शोधले असून त्यातील काही गुरूसारखे वायूचे तप्त गोळे आहेत. त्यांचे गुणधर्मही गुरूसारखे आहेत, त्यांच्या कक्षा ताऱ्याच्या जवळून असल्याने त्यांचा पृष्ठभाग तप्त असून ताऱ्याच्या प्रकाशाशिवाय त्यांचा सखोल अभ्यास अवघड आहे. हबल दुर्बिणीने कमी तरंगलांबीतील गुरूसारखे अनेक तप्त ग्रह शोधून काढले होते त्यात त्या ग्रहांवर कमी पाणी असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे गुरूसारख्या तप्त असलेल्या दहा बाह्य़ग्रहांचा व्यापक अभ्यास करण्यात आला. त्यातील केवळ तीनच ग्रहांच्या वातावरणाचा विस्तृत अभ्यास आधी करण्यात आला होता. आताच्या अभ्यासात या बाह्य़ग्रहांचा वर्णपंक्ती नकाशा तयार करण्यात आला असून हे संशोधन ‘नेचर’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.