उन्नाव येथील सामूहिक बलात्कार पीडित महिलेच्या मृत्यूप्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर जलदगती न्यायालयात खटला चालवण्यात येईल असे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी जाहीर केले.

उन्नाव येथील पीडित महिलेचा तिला गुरुवारी पेटवून देण्यात आल्यानंतर शुक्रवारी रात्री ११.४० वाजता दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला होता. तिला गुरुवारी लखनौ येथून हवाई रुग्णवाहिकेतून उपचारासाठी दिल्लीत आणले होते. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी सांगितले की,  त्या पीडितेचा अखेर मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना आहे. त्या मुलीच्या कुटुंबावर काय संकट असेल हे मी समजू शकतो. सर्व गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा केली जाईल याची त्यांनी खात्री बाळगावी.

काँग्रेस नेते रंजीत रंजन यांनी सांगितले की, सर्व बलात्कारी आरोपींना तुरुंगातून बाहेर आणून रस्त्यावर फाशी देण्यात यावे. त्यातून समाजात योग्य तो संदेश जाईल व अशा घटना पुन्हा होणार नाहीत. ज्यांनी मुलीला जाळले त्यांचीही तीच गत करावी. उत्तर प्रदेशचे न्याय मंत्री ब्रजेश पाठक म्हणाले की,  महिलांवरील अत्याचार प्रकरणांचे राजकारण करण्यात आले. यातील गुन्हेगारांना ते कितीही  शक्तिशाली असले तरी आम्ही सुटू देणार नाही.

पीडितेच्या गावात नेत्यांविरुद्ध निदर्शने

भाजपचे खासदार साक्षी महाराज आणि उत्तर प्रदेशचे मंत्री स्वामीप्रसाद मौर्य आणि कमल राणी वरुण हे उन्नाव बलात्कारपीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गावात आले असता संतप्त नागरिकांनी शनिवारी सायंकाळी जोरदार निदर्शने केली.

पीडितेच्या घराबाहेर जमलेल्या गर्दीला पांगविण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला त्यामध्ये काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांसह काही निदर्शक जखमी झाले. या वेळी साक्षी महाराज आणि राज्य सरकारविरोधात निदर्शकांनी ‘वापस जाओ’ अशी घोषणाबाजी केली.