दिल्लीत लॉकडाउननंतर करोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचं दिसत आहे. रुग्ण कमी झाल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताणही कमी झाला आहे. त्यामुळे रुग्णालयात करोनाबाधित रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यास मदत होत आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत दिल्लीतील आरोग्य यंत्रणेची स्थिती पाहता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ठोस उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. आता दिल्लीतील प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेरची बँक उभारण्याची घोषणा त्यांनी केली आहे. या योजनेची अमलबजावणी आजपासून होणार आहे.

करोनाबाधित अनेक रुग्णांना घरी आयसोलेट करण्यात आलं आहे. त्यांना वेळी अवेळी ऑक्सिजनची गरज भासू शकते. यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या रुग्णांना घरपोच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पोहोचवण्याची व्यवस्था केली आहे. रुग्णांच्या मागणीनंतर दोन तासाच्या आत त्यांना ही सेवा मिळणार आहे. जे रुग्ण करोनातून बरे झाले आहेत अशा रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासल्यास त्यांनाही ही सेवा घेता येणार आहे.

‘आजपासून आम्ही दिल्लीत ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर बँक सुरु करत आहोत. प्रत्येक जिल्ह्यात २०० ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर बँक असतील. मेडिकल ऑक्सिजन वेळेत उपलब्ध न झाल्यास अनेक रुग्णांना आयसीयूत भरती करावं लागतं. त्यामुळे अनेक रुग्णांचा मृत्यूही होतो. त्यामुळे ही समस्या सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे’, असं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं.

GREAT..! व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णासाठी धावला यजुर्वेंद्र चहल, केली ‘इतकी’ मदत

गेल्या २४ तासात दिल्लीत ६५०० नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. करोना रुग्णवाढीचा दर ११ टक्क्यांवर आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर दिल्लीत १००० खाटांच्या आयसीयूचा सेट अप करण्यात आला आहे. गेल्या १५ दिवसांच्या अथक परिश्रमातूम हे उभं राहिल्याचं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं आहे. दिल्लीत करोनाचा फैलाव रोखण्यासठी १९ एप्रिलपासून लॉकडाउन करण्यात आला आहे. या आठवड्यातील लॉकडाउनमध्ये निर्बंध आणखी कडक करण्यात आले आहेत.