निवडणूक हंगामात यात्रा काढणारे तिघे पराभूत, एकाला सत्ता

संतोष प्रधान, मुंबई</strong>

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात लोकांशी संवाद साधणार असले तरी गेल्या वर्षभरात निवडणूक हंगामात चार विविध यात्रा निघाल्या, पण यात्रा काढणाऱ्या तीन मुख्यमंत्र्यांना सत्ता गमवावी लागली, तर राज्यभर पदयात्रा काढणाऱ्या जगनमोहन रेड्डी यांना आंध्र प्रदेशची सत्ता मिळाली.

राज्याची सत्ता कायम राखण्याचा भाजपने निर्धार केला असून, याचाच भाग म्हणून राज्यातील जनतेशी संवाद साधण्याच्या उद्देशाने १ ऑगस्टपासून महाजनादेश यात्रा काढणार आहेत. ३२ जिल्ह्य़ांतील १५० विधानसभा मतदारसंघांतून ही यात्रा जाणार असून, ४३८४ कि.मी. एवढा प्रवास मुख्यमंत्री करणार आहेत. राज्य सरकारच्या पाच वर्षांतील कामांचा हिशेब जनतेसमोर मांडण्याच्या उद्देशाने ही यात्रा काढण्यात येणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

निवडणुकीच्या हंगामात राज्यव्यापी यात्रा काढणारे फडणवीस हे देशातील पाचवे नेते आहेत. गेल्या वर्षी निवडणुकीच्या तोंडावर मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान यांनी जनआशीर्वाद यात्रा, राजस्थानात वसुंधराराजे यांनी गौरवयात्रा आणि छत्तीसगडमध्ये रमणसिंग यांनी विकासयात्रा काढल्या होत्या. भाजपच्या तीन तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी पाच वर्षांत केलेल्या कामाचा हिशेब देण्यासाठी यात्रा काढल्या होत्या. याबरोबरच आंध्र प्रदेशमध्ये तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि वायएसआर काँग्रेसचे नेते जगनमोहन रेड्डी यांनी प्रजा संकल्प या नावाने पदयात्रा काढली होती. मतदारांशी संपर्क साधणे आणि केलेल्या कामांची माहिती जनतेला सादर करण्याच्या उद्देशाने भाजपच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या यात्रांचा राजकीय फायदा झाला नाही. कारण मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तिन्ही राज्यांमध्ये भाजपला सत्ता गमवावी लागली. भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांनी यात्रा काढूनही त्याचा फारसा उपयोग झाला नाही. शिवराजसिंह चौहान यांना यात्रा गुंडाळावी लागली होती. वसुंधराराजे यांच्या यात्रेवरून वाद झाला होता. या उलट वडील वाय एस राजशेखर रेड्डी यांच्या प्रमाणेच निवडणुकीच्या तोंडावर राज्यव्यापी पदयात्रा काढलेल्या जनगमोहन रेड्डी यांना त्याचा फायदा झाला. आंध्र प्रदेशात जनगमोहन यांच्या नेतृत्वाखाली वायएसआर काँग्रेसला तीन चतुर्थाश एवढे बहुमत मिळाले.

देशात यात्रांचा मोठा राजकीय इतिहास आहे. स्वातंत्र्यलढय़ात महात्मा गांधी यांची दांडी यात्रा किंवा चंपारण्य यात्रा प्रसिद्ध आहेत. लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेमुळे १९९०च्या दशकात देशाच्या राजकारणाचा पोतच बदलला होता. माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांची भारत यात्रा गाजली होती. पंजाबमध्ये दहशतवाद्यांनी थैमान घातले असताना चित्रपट अभिनेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुनील दत्त यांनी काढलेल्या शांतीयात्रेची बरीच चर्चा झाली होती.

जनतेशी संवाद साधणे आणि गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामांचा हिशेब जनतेसमोर मांडण्यासाठीच ही महाजनादेश यात्रा काढण्यात येणार आहे. केलेली कामे मांडण्याकरिता मुख्यमंत्री थेट जनतेत जात आहेत. मुख्यमंत्र्यांबद्दल लोकांच्या मनात आदराची भावना आहे. जनतेशी संवाद आणि संपर्क साधण्यासाठीच मुख्यमंत्री गावोगावी जात आहेत. निवडणूक  हा यात्रेचा एक उद्देश आहेच.

– चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री

यात्रेचा प्रवास

* विदर्भ – १२३२ किमी (४४ मतदारसंघ)

* उत्तर महाराष्ट्र – ६३३ किमी (३४ मतदारसंघ)

* मराठवाडा – १०६९ किमी (२८ मतदारसंघ)

* पश्चिम महाराष्ट्र – ८१२ किमी (२९ मतदारसंघ)

* कोकण – ६३८ किमी (१५ मतदारसंघ)