शनिशिंगणापूर चौथ-यावरील महिला प्रवेश वादासंदर्भात आज येथील जिल्‍हाधिकारी कार्यालयात समन्वय बैठक घेण्‍यात आली. मात्र या बैठकीत कोणताही निणर्य घेण्‍यात न आल्‍याने ही बैठक निष्‍फळ ठरली. ही परंपरा ४०० वर्षांची असल्याने ती मोडणे शक्य नसल्याचे विश्वस्तांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आहेत.
अहमदनगरचे तहसीलदार, शनी मंदिराचे विश्वस्त आणि कार्यकर्ते यांच्यात ही बैठक झाली. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांचीही बैठकीला उपस्‍थिती होती. दरम्यान, तृप्ती देसाई यांनी मुख्‍यमंत्री महिलांच्‍या बाजूने सकारात्‍मक निर्णय घेतील असा विश्वास व्यक्त केला. शनी चौथ-यावरील महिलांच्या प्रवेशावरील वादाबाबत मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील आणि त्यांचा हा निर्णय आम्हाला मान्य असेल, असे तृप्ती यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. यासंदर्भात मुख्यमंत्री कोणता निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काही दिवसांपूर्वी शनी शिंगणापूर येथील शनी मंदिरातील चौथर्‍यावर चढून एका महिलेने शनी देवाचे दर्शन घेतले होते.