दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल लोकसभा निवडणूकीत झालेल्या दारूण पराभवानंतर या दिवसात चिंतन करत आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी आज (रविवार) पार्टी कार्यकर्त्यांची चिंतन बैठक बोलावली आहे. पंजाबी बाग क्लब येथे होत असलेल्या या बैठकीत लोकसभा निवडणूकीत पार्टीला मिळालेल्या सपशेल अपयशाच्या कारणांची मिमांसा केली जाणार आहे. तसेच, दिल्लीच्या आगामी विधानसभा निवडणूकांसाठी योजना आखली जाणार आहे.

या लोकसभा निवडणूकीत आम आदमी पार्टीचे प्रदर्शन अतिशय वाईट झाले. पार्टीचे एकमेव खासदार भगवंत मान हेच केवळ आपली जागा राखू शकले. तर दिल्लातील सातही जागांवर पार्टीच्या उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले. हा पक्षासाठी एकप्रकारे मोठा झटकाच होता. दिल्लीत ‘आप’ला मिळालेली मत केवळ १८ टक्के होती. तर भाजपाला ५६ टक्के व काँग्रेसला २३ टक्के मत मिळाली. तर ‘आप’च्या दिलीप पांडे, पंकज गुप्ता व ब्रजेश गोयल या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.

पंजाब व दिल्ली व्यतिरिक्त पार्टीने हरियाणामध्ये देखील उमेदवार उभे केले होते. मात्र, तिथेही कोणताही उमेदवार विजयी होऊ शकला नाही. आता पक्षाने आपले संपूर्ण लक्ष आगामी विधासभा निवडणुकांवर केंद्रीत केले आहे.