पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात तृणमुल काँग्रेसचे कार्यकर्ते सुधारित नागरिकत्व कायदा (CAA) व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (NRC) चा जोरदार विरोध करत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपाचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी ममता बॅनर्जींनी मानसिक संतुलन गमावले आहे, अशा शब्दात टीका केली आहे. याचबरोबर त्यांनी ममता यांनी डॉक्टरकडे जाऊन तपासणी करून घेण्याची आवश्यकता असल्याचेही म्हटले आहे.

या अगोदर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विद्यार्थांनी सीएए विरोधात लोकशाही मार्गाने विरोध सुरू ठेवायला हवा असे म्हटले होते. शिवाय, आंदोलना दरम्यान मृत्यू झालेल्या मंगलौर येथील एका युवकाच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत करणार असल्याची देखील त्यांनी घोषणा केली होती.

 मतपेटीवर परिणाम होण्याची भीती –
सुधारित नागरिकत्व कायदा लागू करण्यात आल्यानंतर घुसखोर ओळखले जातील व त्याचा मतपेटीवर परिणाम होईल, ही ममता बॅनर्जी यांना भीता आहे. शिवाय, त्या आपला आधार गमावत आहेत, म्हणूनच त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. यामुळे त्या अशाप्रकारची कृत्य करत आहेत, त्यांना वैद्यकीय तपासणीची आवश्यकता आहे. असे कोलकाता येथील रॅलीप्रसंगी भाजपा नेते विजयवर्गीय म्हणाले आहेत.

एनआरसी आणि सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आक्रमक भूमिका घेतलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारला उच्च न्यायालयानं धक्का देणारा निर्णय दिला आहे. एनआरसी आणि सुधारित नागरिकत्व कायदा राज्यात लागू होऊ देणार नाही, अशी भूमिका घेत ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला आव्हान दिलं होतं. तशा जाहिराती पश्चिम बंगाल सरकारने प्रकाशित करणं सुरू केलं होतं. त्यावर न्यायालयानं बंदी घातली आहे.