स्वादुपिंडाच्या आजारावर उपचारांसाठी अमेरिकेत गेलेले माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत. मात्र, अधिक चांगल्या उपचारांसाठी त्यांना अजून काही काळ अमेरिकेत रहावे लागणार आहे. त्यामुळे पर्रिकर लवकरच मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचारांसाठी परतणार असल्याच्या बातम्या खोट्या असल्याचा खुलासा गोवा सरकारने केला आहे.


दरम्यान, पर्रिकर उपचारांसाठी अमेरिकेला गेले असल्याने त्यांच्या अनुपस्थितीत गोव्याचा कारभार पाहण्यासाठी एका त्रिसदस्यीस समितीची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, गोव्यातील खाण प्रश्नावरून पर्रिकरांच्या अनुपस्थितीत गोव्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी शिवसेनेने केली होती. खाण क्षेत्रावर अवलंबून असलेल्यांना दिलासा देण्यासाठी भाजपाकडे सक्षम नेतृत्व नसल्याने राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी शिवसेना नेत्यांनी केली होती.

पर्रिकर यांना १५ फेब्रुवारी रोजी पोटात दुखत असल्याने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पर्रिकर यांच्या स्वादुपिंडाला सूज आली होती. त्यावेळी त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला, त्यानंतर त्यांनी गोवा विधानसभेचा अर्थसंकल्पही सादर केला. मात्र, त्यानंतर त्यांना पुन्हा त्रास होऊ लागल्याने त्यांना पुन्हा लीलावतीत दाखल करण्यात आले. मात्र, त्यानंतर अधिक चांगल्या उपचारांसाठी त्यांना अमेरिकेत हलवण्यात आले.