विद्यार्थ्यांमधील वाढत्या हिंसक वृत्तीमागे इंटरनेट आणि अन्य सोशल मीडिया असल्याचं अनेकदा मनोविश्लेषकांनी सांगितलं आहे. महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचंही पहायला मिळत आहे. तसंच हिंसक घटनांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं समोर येत आहे. पॉर्न साईट्समुळे अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. हे प्रकार रोखण्यासाठी बिहार सरकारनं पुढाकार घेतला असून पॉर्न साईट्सपासून दूर राहण्यासाठी सरकार विद्यार्थ्यांना धडे देणार आहे.

शालेय विद्यार्थ्यांना याबाबत माहिती देण्यात येणार आहे, अशी माहिती बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिली. बिहारमधील सरकारी शाळांमध्ये अनेक योजना राबवण्यात येत आहेत. आता पॉर्न विरोधात विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी अभियान राबवण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

आमचा पॉर्न साईट्सना विरोध : नितीश कुमार
जगभरात पॉर्न साईट्सवर अश्लिल व्हिडीओ पाहिले जातात. अनेक लोकं आपल्या मोबाईलवरही असे अश्लिल व्हिडीओ पाहतात. आम्ही पॉर्न साईट्सच्या विरोधात आहोत आणि अशा साईट्सवर पूर्णत: बंदी घालण्याबाबत आम्ही केंद्र सरकारला पत्रदेखील लिहिले असल्याचं नितीश कुमार यांनी विधानसभेच्या संयुक्त सत्रादरम्यान बोलताना सांगितलं. देशातील वाढत्या बलात्कारांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर १६ सप्टेंबर २०१९ रोजी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र पाठवलं होतं. तसंच त्यात त्यांनी सर्व पॉर्न साईट्सवर बंदी घालण्याची मागणी केली होती.