बिहार सरकारने वृद्धांसाठी एका नव्या सार्वत्रिक पेन्शन योजनेची घोषणा केली आहे. ‘मुख्यमंत्री वृद्धजन पेन्शन योजना’ (एमव्हीपीवाय) असे या योजनेचे नाव आहे. ६० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या सर्वांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. शिवाय माध्यमांमध्ये कार्यरत असलेल्या वयोवृद्ध पत्रकारांना देखील पेन्शन दिले जाणार आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या योजनेची माहिती दिली. १ एप्रिल २०१९ पासून या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. शासकीय सेवानिवृत्त असलेल्या वयोवृद्धांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. या योजनेअंतर्गत ६० वर्षांपेक्षा जास्त वय व पात्र असलेल्या सर्वांना मासिक ४०० रूपये पेन्शन तर ८० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्याना ५०० रूपये प्रति महिना दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

या योजनेची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सांगितले की, या योजनेसाठी राज्य सरकारने १८ हजार कोटी रूपयांचा विशेष निधी तयार केला आहे. आम्ही गरीब वृद्धांचा आदर व सन्मान करणार आहोत. आतापर्यंत जवळपास दोन लाख जणांनी या योजनेच्या लाभासाठी ऑनलाइन अर्ज केले आहेत, तर ३५ ते ३६ लाखांपर्यंत अर्जाचा आकडा जाईल अशी सरकारला अपेक्षा आहे.

सध्या वृद्धांसाठी असलेली पेन्शन योजना केवळ मागास प्रवर्गालाच लागू आहे. याशिवाय मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ६० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या पत्रकारांना सहा हजार रूपये पेन्शन जाहीर केले आहे. जे पत्रकार सध्या माध्यमांमध्ये कार्यरत आहेत आणि ज्यांना कोणतेही पेन्शन मिळत नाही ते ‘बिहार पत्रकार सन्मान योजने’च्या लाभास पात्र असणार आहेत. या योजनेची देखील या वर्षाच्या १ एप्रिलपासून अंमलबजावणी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.