भाजपकडून निरीक्षकांची नियुक्ती

गोवा वगळता उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर या तीन राज्यात मुख्यमंत्री कोण होणार, याचे सर्वाधिकार भाजपच्या सांसदीय मंडळाने पक्षाध्यक्ष अमित शहा यांना दिले आहेत. पक्षाने या तीन राज्यांसाठी निरीक्षक नियुक्त केले असून त्यांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे शहा संबंधित राज्याचे मुख्यमंत्री कोण होणार,  याचा निर्णय घेणार आहेत.

पाच राज्यात नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या. पंजाब वगळात इतर चार राज्यात भाजपने सत्तेकडे वाटचाल सुरू केली आहे. गोवा विधानसभेत भाजपने अपक्ष आणि इतर छोटय़ा पक्षांच्या मदतीने सत्तास्थापनेचा दावा राज्यपालांकडे केला आहे. मणिपूर, उत्तराखंड आणि देशातील सर्वात मोठय़ा उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री कोण असेल, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या दोन्ही विधानसभेत भाजपकडे बहुमताचा आकडा आहे. येथे पक्षाकडून आज मुख्यमंत्र्यांचा उमेदवार निश्चित होणार, असे संकेत भाजपकडून मिळाले होते. मात्र, रविवारी रात्रीपर्यंत भाजपकडून या दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नव्हती. रात्री उशिरा पक्षाच्या सांसदीय मंडळाने पक्षनेत्यांशी सल्लामसलत करून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण असेल, याचे नाव ठरविण्याचे अंतिम अधिकार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना दिले. यासाठी पक्षाने तीनही राज्यांसाठी पक्षनिरीक्षक नियुक्त केले आहेत. उत्तर प्रदेशसाठी पक्षाचे नेते जे.पी. नंदा, केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू, भूपेंद्र यादव यांची, तर उत्तराखंडसाठी नरेंद्र तोमर आणि सरोज पांडे यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली. तसेच केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल आणि विनय सहस्रबुद्धे यांची मणिपूर राज्यासाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांनी राज्यात कोण मुख्यमंत्रिपदाचा दावेदार आहे, याचा अहवाल अमित शहा यांना द्यायचा आहे. त्यानंतर शहा हे उमेदवाराचे नाव निश्चित करतील.