मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिल्लीत भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांच्यासोबत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊतही उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे. या दौऱ्यात त्यांनी सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. तर काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांची भेट घेतली.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांची मैत्री सर्वश्रुत आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर हे दोन नेते एकत्र आले होते. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आडवाणी यांची भेट घेणं महत्त्वाचं आहे.  भाजपासोबतची युती महाराष्ट्रामध्ये तुटली असली तरीही शिवसेनेने हिंदुत्व सोडलेलं नाही हे सांगण्याचा प्रयत्न या भेटीमागे होता अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

भाजपा आणि शिवसेना यांची युती झाली पाहिजे ही भूमिका जशी प्रमोद महाजन यांची होती अगदी तशीच लालकृष्ण आडवाणी यांचीही होती. लालकृष्ण आडवाणी यांनीही कायम बाळासाहेब ठाकरेंना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर साथ दिली. अगदी त्याचप्रमाणे बाळासाहेब ठाकरेही लालकृष्ण आडवाणी यांना जवळचे स्नेही मानत. शिवसेनेने महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केली. त्यानंतर शिवसेनेने हिंदुत्व सोडलं, शिवसेना सेक्युलर झाली अशा चर्चा सुरु झाल्या. या सगळ्याला उत्तर म्हणून ही भेट आहे अशी चर्चा आता रंगली आहे. लालकृष्ण आडवाणी यांना मुख्यमंत्री झाल्यापासून उद्धव ठाकरे पहिल्यांदाच भेटले. त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊतही उपस्थित होते.