अमेरिकेत स्वादुपिंडाच्या आजारावर उपचार घेत असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर याच आठवड्यात गोव्यात परततील, अशी माहिती गोव्याच्या मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्याने दिली आहे. इंडियन एक्स्प्रेसने याबाबत वृत्त दिले आहे.

मार्च महिन्यापासून ६२ वर्षींय पर्रिकर हे अमेरिकेत उपचारांसाठी गेले आहेत. त्यांच्यावरील उपचार आता पूर्ण झाले असून लवकरच ते राज्यात परततील, मात्र त्यांच्या येण्याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. त्यांच्या आगमनाची तयारी कार्यालयाकडून सुरु असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. पर्रिकर अमेरिकेतून मुंबईत येतील त्यानंतर ते दुसऱ्या विमानाने गोव्याला रवाना होतील.

उपचारांसाठी अमेरिकेला रवाना होण्यापूर्वी आपल्या अनुपस्थितीत राज्याचा कारभार सुरळीत चालावा यासाठी पर्रिकर यांनी कॅबिनेट सल्लागार समितीची स्थापना केली होती. या समितीमध्ये सुदीन ढवळीकर (महाराष्ट्र गोमंतक पक्ष), फ्रान्सिस डिसूजा (भाजपा) आणि विजय सरदेसाई (गोवा फॉरवर्ड पार्टी) यांचा या समितीत समावेश आहे.