उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री ओमप्रकाश राजभर यांची हकालपट्टी केली आहे. राज्यपाल राम नाईक यांच्याकडे मुख्यमंत्री योगींनी याबाबत मंजूरीसाठी पत्र पाठवले होते. यानंतर राज्यपाल नाईक यांनी त्यांची ही मागणी मान्य केली. विशेष म्हणजे ओमप्रकाश राजभर यांनी मी या निर्णयाचे स्वागतच करतो असे म्हटले आहे.

ओमप्रकाश राजभर हे उत्तर प्रदेशामध्ये भाजपाचा सहकारी पक्ष असलेल्या सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे प्रमुख आहेत. योगी सरकारमध्ये ते मागासवर्गीय कल्याण मंत्री आणि ‘दिव्यंजन’ सशक्तीकरण मंत्री देखील होते. याशिवाय योगींनी राजभर यांच्या ज्या नेत्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा दिलेला आहे, तो देखील काढून घेण्याची राज्यपालांकडे मागणी केली आहे.

मागिल काही काळापासून राजभर सातत्याने भाजपासह मुख्यमंत्री योगींविरोधात वक्तव्य करत होते. तसेच त्यांच्या अनेक विधानांमुळे अनेकदा भाजपाची देखील अडचण झाली होती. त्यांची अनेक विधान ही समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीच्या बाजूने राहिलेली आहेत. लोकसभा निवडणुकीअगोदरही राजभर यांनी मागासवर्ग मंत्रालयाचा पदभार सोडत असल्याचे सांगत राजीनामा देखील दिला होता. त्यावेळी त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला नव्हता. मात्र, आता लोकसभा निवडणूका संपताच योगींनी निर्णय घेतला आहे.