उत्तर प्रदेशमध्ये आता कॅबिनेटच्या बैठकीत मंत्र्यांना मोबाइल आणता येणार नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तसा आदेशच दिला आहे. या आदेशाची माहिती उप मुख्यंत्री, सर्व कॅबिनेट मंत्री, स्वतंत्र प्रभार असणारे राज्यमंत्री व त्यांच्या सचिवांना दिल्या गेली आहे. बैठकी दरम्यान मंत्र्यांचे पुर्ण लक्ष बैठकीवरच रहावे म्हणुन हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्री योगींच्या डोक्यात अनेक दिवसांपासून ही कल्पना होती असे सांगण्यात आले आहे. कारण, अनेकदा असे निर्दशनास आले आहे की बैठकीदरम्यानही मंत्री मोबाइलवर व्हाट्स अॅपवर व्यस्त राहतात. शिवाय बैठकीत महत्त्वाच्या विषयी चर्चा सुरू असतानाच मध्येच मोबाइल वाजल्याने सर्वांचेच लक्ष विचलीत होते. मुख्यमंत्री योगींच्या या आदेशामागे हे देखील एक कारण सांगितले जात आहे की, कोणतीही गोपनिय माहिती पसरली जाऊ नये. मोबाइल परत मिळवण्यात मंत्र्यांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणुन टोकन व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांना बैठकीस जाण्या अगोदर टोकन घेऊन मोबाइल जमा करावा लागणार आहे. बैठकीनंतरच त्यांना त्यांचा मोबाइल परत मिळणार आहे.

काही महिने अगोदर संत कबीरनगरचे भाजपा खासदार शरद त्रिपाठी व भाजपा आमदार राकेश बघेल यांच्या दरम्यान एका बैठकीत जिल्हाधिकारी तसेच योगी सरकारमधील मंत्री आशुतोष टंडन यांच्या समक्ष झालेली हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेला असावा, अशी चर्चा आहे.