एकीकडे करोनाचं संकट असताना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. बेरोजगारीचं प्रमाण लॉकडाउनच्या आधी जितकं होता तितकं झालं असून ८.७५ टक्क्क्यांर पोहोचलं आहे. ही आकडेवारी २१ जूनपर्यंतची आहे. थिंक टँक सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या सर्व्हेतून (CMIE) ही माहिती समोर आली आहे. मनरेगासारख्या योजनांचा फायदा झाल्याचं यावेळी सांगण्यात आलं आहे.

मार्च महिन्यात ८.७५ टक्के असणारं बेरोजगारीचं प्रमाण एप्रिल आणि मे महिन्यात २३.५ टक्क्यांवर पोहोचलं होतं. ३ मे रोजी समाप्त होणाऱ्या आठवड्यात हे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचं निदर्शनास आलं होतं. त्यावेळी २७.१ टक्क्यांची नोंद झाली होती.

सीएमआयईचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ महेश व्यास यांनी दिलेल्या माहितीनुसार, “जूनच्या पहिल्या तीन आठवड्यात बेरोजगारीच्या दरात मोठी घट होऊन अनुक्रमे १७.५, ११.६ आणि ८.५ टक्के झाली”. यादरम्यान शहरातील बेरोजगारी २१ जूनच्या आठवड्यात कमी होऊन ११.२ टक्के झाली. मात्र ही घट लॉकडानच्या आधी असणाऱ्या ९ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

यादरम्यान ग्रामीण भागातील बेरोजगारीच्या प्रमाणात मोठी घट झाली असून ७.२६ टक्क्यांवर आली आहे. हे प्रमाण लॉकडानच्या पहिल्या आठवड्यातील म्हणजेच २२ मार्चला समाप्त होणाऱ्या आठवड्याच्या ८.३ टक्क्यांपेक्षा कमी आहे. इतकंच नाही तर फेब्रुवारीमधील ७.३४ टक्के आणि मार्चमधील ८.४ टक्क्यांपेक्षाही कमी आहे.

“सरकारकडून मनरेगा योजना चांगल्या पद्धतीने राबवण्यात आल्याने तसंच वेळेत झालेला पाऊस आणि पेरणी झाल्याचा हा परिणाम आहे. ज्यामुळे ग्रामीण भागाती लोकांच्या हाताला काम मिळालं आहे आणि बेरोजगारीचं प्रमाण कमी झालं आहे,” असं महेश व्यास यांनी सांगितलं आहे.