व्हाईट हाऊस प्रतिनिधी जीम अकोस्टा यांचे प्रेस ओळखपत्र रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात मीडिया कंपनी CNN ने मंगळवारी ट्रम्प प्रशासनाविरोधात न्यायालयात खटला दाखल केला आहे. मागच्या आठवडयात व्हाइट हाऊसमध्ये पत्रकार परिषदे दरम्यान जीम अकोस्टा आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये शाब्दीक बाचाबाची झाली होती.

जिम अकोस्टा यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना विस्थापितांबाबतचा प्रश्न विचारला. त्यावेळी ट्रम्प यांच्या रागाचा पारा चढला आणि त्यांनी या पत्रकाराला बसायला सांगितले. एवढेच नाही तर तू तुझा माईक बंद कर, तुझ्यासारखा माणूस जेव्हा सीएनएन सारख्या चॅनलमध्ये काम करतो ही त्या कंपनीला लाज बाळगण्यासारखी गोष्ट आहे. तुला कुठे काय बोलावं ते कळत नाही तू एक उद्धट माणूस आहेस असं म्हणत या पत्रकाराचा ट्रम्प यांनी पाणउतारा केला होता. या वादानंतर पत्रकाराचे ओळखपत्र काढून घेण्यात आले. व्हाइट हाऊसला अकोस्टा यांचे प्रेसचे कार्ड परत करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी CNN ने कोर्टापुढे केली आहे.

काय घडले होते
मध्यवर्ती निवडणुकांच्या वेळी तुम्ही विस्थापितांचा प्रश्न का पुढे आणला? असा प्रश्न या पत्रकाराने विचारला ज्यानंतर ट्रम्प यांचा पारा चढला आणि त्यांनी या पत्रकाराला खडे बोल सुनावले आहे. त्यानंतरही या पत्रकाराने आपली जिद्द कायम ठेवत डोनाल्ड ट्रम्प यांना दुसरा प्रश्न विचारला. २०१६ मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक जेव्हा पार पडली तेव्हा त्या निवडणुकीत रशियाचा सहभाग होता असा आरोप होतो आहे त्याबद्दल तुमचे काय म्हणणे आहे ? असे या पत्रकाराने विचारले. ज्यानंतर डोनाल्ड ट्रम्प आणखी चिडले. या पत्रकाराचे ओळखपत्रही काढून घेण्यात आले आणि त्याच्यावर ट्रम्प खेकसलेच.

तुला लोकप्रतिनिधींशी आणि लोकांशी कसे वागावे ते समजत नाही. तुझ्यासारखा माणूस सीएनएन मध्ये कसा काय काम करू शकतो? तुझ्यासारख्या माणसाला आणि तुझ्या चॅनलला फक्त फेक न्यूज चालवायच्या असतात ज्याने तुम्हाला टीआरपी मिळतो पण तुम्ही देश चालवू शकत नाही ते माझे काम आहे असेही ट्रम्प यांनी या पत्रकाराला सुनावले.