‘एनडीटीव्ही’चे सहसंस्थापक प्रणव रॉय, राधिका रॉय आणि प्रोमोटर आरआरपीआर हॉल्डिंग प्रायव्हेट लिमिटेडमागे सीबीआय चौकशीचा ससेमिरा लागला असतानाच आता एनडीटीव्हीमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. स्पाइसजेटचे सहसंस्थापक आणि मालक अजय सिंह हे एनडीटीव्हीमधील समभाग विकत घेणार असल्याचे समजते. मात्र ‘एनडीटीव्ही’ने एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना हे वृत्त फेटाळून लावले आहे.

आयसीआयसीआय या खासगी क्षेत्रातील बँकेची सुमारे ४८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरुन सीबीआयने जूनमध्ये एनडीटीव्हीचे सहसंस्थापक डॉ. प्रणव रॉय, त्यांच्या पत्नी राधिका यांच्यासह काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरावर छापे मारले होते. यानंतर प्रणव रॉय, राधिका रॉय आणि एनडीटीव्हीचे प्रोमोटर अडचणीत आले होते.

‘इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार एनडीटीव्ही आणि स्पाइस जेटमध्ये करार होणार असल्याचे समजते. यानुसार एनडीटीव्हीमधील सुमारे ४० टक्के हिस्सा अजय सिंह यांच्याकडे असेल. तर प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांच्याकडे २० टक्के हिस्सा असेल. अजय सिंह आणि एनडीटीव्हीतील हा करार सुमारे ५०० कोटी रुपयांचा असेल. ‘स्पाइसजेट’च्या अधिकाऱ्यांनी ‘एनडीटीव्ही’सोबत करार होणार असल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. तर एनडीटीव्हीनेही हे वृत्त निराधार असल्याचे सांगितले.

प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांनी १९८८ मध्ये ‘न्यू दिल्ली टेलिव्हिजन लिमिटेड’ अर्थात ‘एनडीटीव्ही’ची स्थापना केली होती. गेल्या वर्षभरापासून एनडीटीव्ही अडचणीत येत आहे. सीबीआयच्या कारवाईपूर्वी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे अतिप्रमाणात वार्तांकन केल्याप्रकरणी केंद्र सरकारने वृत्तवाहिनीला एक दिवस प्रक्षेपण बंद ठेवण्याचे आदेश दिले होते.

अजय सिंह हे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचार समितीच्या कोअर टीममध्ये होते. ‘अबकी बार मोदी सरकार’ या टॅगलाईनचे श्रेयदेखील अजय सिंह यांनाच दिले जाते. अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे ओएसडी म्हणून त्यांनी काम केले होते. दिल्ली आयआयटीमधून त्यांनी बीटेक केले असून कॉर्नेल विद्यापीठातून त्यांनी एमबीए केले आहे.