‘हिंदाल्को’ कंपनीशी संबंधित कोळसा खाण वाटप खटल्यातील ‘केस डायरी’ आणि ‘गुन्हे फाइल’ केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) विशेष न्यायालयासमोर बंद लिफाफ्यात गुरुवारी सादर केल्या.  
या खटल्यात सीबीआयने दाखल केलेल्या अंतिम अहवालावरील सुनावणी येत्या १२ डिसेंबर रोजी होईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयाच्या आदेशानंतर दोन दिवसांनी सीबीआयने याप्रकरणी बंद लिफाफ्यातील कागदपत्रांचा गठ्ठा विशेष न्यायालयाला सादर केला. न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व कागदपत्रे सादर करण्यात आल्याचे वरिष्ठ सरकारी वकील व्ही. के. शर्मा यांनी विशेष सीबीआय न्यायाधीश भारत पराशर यांना सांगितले. तपास अधिकाऱ्याने कोळसा खटल्यातील ‘केस डायरी’ आणि गुन्हे फाइल, अशी दोन्ही कागदपत्रे सादर करण्याविषयी सांगितले होते.
 याशिवाय या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे सादर करण्यास न्यायालयाला सादर करण्याविषयी साहाय्य करण्याचे स्पष्ट केले होते. आता या प्रकरणी येत्या १२ डिसेंबर रोजी सुनावणी होईल. यात आणखीन स्पष्टीकरण हवे असल्यास आम्ही सीबीआयला तसे आदेश देऊ आणि त्यानंतरच अंतिम अहवालावर निकाल दिला जाईल, असे न्या. पराशर यांनी सुनावणीदरम्यान स्पष्ट केले.
कोळसा खाणवाटप घोटाळ्याप्रकरणी उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला, कोळसा मंत्रालयाचे माजी सचिव पी. सी. परख आणि इतरांविरोधात ‘एफआयआर’ दाखल झाला आहे.