पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावरही कोळसा खाणवाटपात कारस्थान रचल्याच्या आरोप ठेवा, अशी मागणी करणारे माजी कोळसा सचिव पी. सी. पारख यांना माजी सनदी अधिकाऱय़ांनी पाठिंबा दर्शविला आहे. प्रामाणिक अधिकाऱयांची पिळवणूक केली जाणार असेल तर सरकारची विश्वासार्हता धोक्यात येईल आणि कोणताही अधिकारी निर्णय घेण्यास धजावणार नाही, असेही या अधिकाऱयांनी स्पष्ट केले.
माजी कोळसा सचिव ई. ए. एस शर्मा म्हणाले, माझ्या माहितीप्रमाणे पारख हे खूप प्रामाणिक आणि सक्षम अधिकारी आहेत. सीबीआयच्या तपासावर मला काहीही मत मांडायचे नाही. मात्र, केवळ पारख यांच्याविरुद्ध कसा काय गुन्हा दाखल करण्यात आला, हे मला समजले नाही. पंतप्रधान कार्यालयातील कोणावरही किंवा कोणत्याही मंत्र्यावर का गुन्हा दाखल करण्यात आला नाही. जर हे कारस्थान रचल्याचे प्रकरण असेल, तर कारस्थान रचणाऱया सर्वांना आरोपी केले पाहिजे. या स्वरुपाच्या प्रकरणांमध्ये तपास अतिशय तटस्थपणे केला गेला पाहिजे. त्यामध्ये कोणाचाही हस्तक्षेप खपवून घेता कामा नये. अप्रमाणिक मंत्री, राजकारणी आणि अधिकाऱयांना सोडून दिले जाते आणि प्रामाणिक अधिकाऱयाची पिळवणूक केली जाते, हे अतिशय निंदनीय आहे.
कोळसा खाणवाटप घोटाळ्यात पंतप्रधान कार्यालयाची काय भूमिका आहे, याचा तपास करण्यासाठी मी गेल्या वर्षी १५ जून रोजी केंद्रीय दक्षता आयोगाला अर्ज दिला होता, असेही शर्मा यांनी सांगितले.
माजी कॅबिनेट सचिव टी. एस. आर. सुब्रमण्यम म्हणाले, पारख यांच्याविरुद्ध सीबीआयने केलेल्या कारवाईमुळे अधिकारी कोणताही निर्णय घेण्यास धजावणार नाहीत. प्रशासनात चांगले, वाईट, प्रामाणिक, अप्रामाणिक असे सर्व प्रकारचे अधिकारी असतात. मात्र, अधिकाऱयांवरील कारवाई बुद्धिला पटण्यायोग्य असली पाहिजे.