कोळसा घोटाळ्यात पंतप्रधानच प्रमुख आरोपी असतील, असे विधान तत्कालीन कोळसा सचिव पारख यांनी करून, तसेच पारख यांच्या ‘बांधीलकी’बद्दल भारताच्या माजी केंद्रीय दक्षता आयुक्तांनी विश्वास व्यक्त करून चोवीस तासही उलटत नाहीत तोच याप्रकरणी ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचीही केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडून (सीबीआय) चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. २००५ मध्ये आदित्य बिर्ला कंपनीच्या वतीने दाखल करण्यात आलेला अर्ज फेटाळला गेल्यानंतर ‘हिंडाल्को’ला कोळसा खाणींचे वाटप करण्यात आले होते. यात काही नियमबाह्य़ बाबी असल्यामुळे ही चौकशी होणार असल्याचा अंदाज आहे.
कोळसा घोटाळ्याच्या कागदपत्रांची छाननी करताना नवीन पटनायक यांनी केंद्र सरकारच्या कोळसा मंत्रालयाला लिहिलेली काही पत्रे हाती लागली आहेत. ‘हिंडाल्को’ला कोळसा खाणी देण्याचा निर्णय फिरवण्यात आला होता, तो रद्द करण्यात यावा अशी मागणी पटनायक यांनी केली होती. त्यामुळे पटनायक यांच्या चौकशीची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अर्थात या घोटाळ्याप्रकरणी नेमकी किती जणांची आणि कोणाकोणाची चौकशी करायची याची यादी तयार नसल्याचेही सीबीआयमधील काही अधिकाऱ्यांनी सांगितले.
हिंडाल्को कार्यालयांवर छापे
हिंडाल्को इंडस्ट्रीजच्या कार्यालयांवर धाडी टाकून जप्त करण्यात आलेली २५ कोटी रुपयांची मालमत्ता आयकर विभागाने ताब्यात घेतली. कोळसा खाणींच्या वाटपादरम्यान भ्रष्टाचार झाला असल्याच्या आरोपामुळे सदर रक्कम जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती आयकर विभागाने दिली. सदर रक्कम कोठून आली याची माहिती हिंडाल्कोने आपल्या जवळील कागदपत्रांद्वारे द्यावी, असेही आयकर विभागाने म्हटले आहे. बुधवारी केंद्रीय अन्वेषण विभागाने युको बँकेच्या इमारतीवरील चौथ्या मजल्यावर असलेल्या कार्यालयात छापा टाकून २५ कोटी रुपये जप्त केले होते.