नव्या वर्षांच्या मध्यरात्री पोरबंदरनजीक आलेल्या पाकिस्तानच्या बोटीला उडविण्याचे आदेश आपणच दिले होते, असे वक्तव्य करणारे वायव्य प्रांताचे तटरक्षकदल प्रमुख बी. के. लोशाली यांनी त्यांच्यावर बजावण्यात आलेल्या कारणे-दाखवा नोटिशीला दिलेले उत्तर समाधानकारक नसल्याने तटरक्षक दलाने त्यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
घुसखोरी केलेल्या पाकिस्तानच्या बोटीवरील व्यक्तींनीच सदर बोट स्वत: उडवून दिली होती हा सरकारचा दावा लोशाली यांनी खोडून काढला आणि आपणच बोट उडविण्याचे आदेश दिल्याचे सांगितले होते. तटरक्षक दलाच्या जहाजाने या बोटीचा पाठलाग केला तेव्हा त्यावरील व्यक्तींनीच ती बोट उडविल्याचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर, संरक्षण मंत्रालय आणि तटरक्षक दलाने म्हटले होते.
त्यानंतर लोशाली यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल त्यांच्यावर कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्या नोटिसीला लोशाली यांनी दिलेले उत्तर समाधानकारक नसल्याने प्रचलित पद्धतीनुसार या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, असे तटरक्षक दलाने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 21, 2015 3:18 am