कोब्रापोस्ट वृत्तसंकेतस्थळाने केलेल्या स्टिंग ऑपरेशननंतर खडबडून जागे झालेल्या देशातील प्रमुख तिन्ही खासगी बॅंकांनी आता वेगाने अंतर्गत चौकशी करण्यास सुरुवात केलीये. 
आयसीआयसीआय, एचडीएफसी आणि ऍक्सिस या तिन्ही खासगी बॅंकांमध्ये काळ्या पैशाचे विविध मार्गांनी पांढऱया पैशात रुपांतर करण्यात येते, असा आरोप कोब्रापोस्टने केला होता. त्यानंतर रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया आणि केंद्रीय अर्थ मंत्रालयानेही या संपूर्ण प्रकरणाची गंभीरपणे दखल घेतली होती.
एचडीएफसी बॅंकेने आपल्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी लेखा परीक्षण क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ‘डेलॉईट टच तोमात्सू इंडिया’ची नेमणूक केलीये. स्टिंग ऑपरेशनमध्ये करण्यात आलेल्या आरोपांची डेलॉईट कंपनीकडून चौकशी करण्यात येणार आहे. बॅंकेने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वाचे किंवा आचारसंहितेचे उल्लंघन झाले आहे का, हे तपासण्यासाठी अमरचंद ऍंड मंगलदास ऍंड सुरेश ए श्रॉफ कंपनीची नेमणूक बॅंकेने केलीये. बॅंकेने शनिवारी काढलेल्या एका निवेदनात याबद्दल माहिती दिली. अंतर्गत पातळीवर बॅंक आपल्या कर्मचाऱयांची चौकशी करते आहे, याचीही माहिती निवेदनात देण्यात आलीये.
दुसरीकडे ऍक्सिस बॅंकेने कथित गैरव्यवहारांचे आरोप करण्यात आलेल्या बॅंकेच्या १६ कर्मचाऱयांना मुख्य प्रशासकीय कार्यालयाशी संपर्क साधण्यास सांगितले आहे. बॅंक संबंधित कर्मचाऱयांची अंतर्गत चौकशी करते आहे. त्याचाच भाग म्हणून १६ कर्मचाऱयांना प्रशासकीय कार्यालयाशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे.
आयसीआयसीआय बॅंकेने आपल्या १८ कर्मचाऱयांना या प्रकरणी निलंबित केले आहे. बॅंकेने नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल दोन आठवड्यात मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.