जेट एअरवेजच्या कोच्चीवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाच्या अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) सोमवारी ताब्यात घेतले. या तरुणाची कसून चौकशी सुरु आहे. या गोंधळामुळे विमानाच्या उड्डाणास विलंब झाला.

सोमवारी दुपारी कोच्चीतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर गोंधळाची स्थिती निर्माण झाली. एका तरुणाने जेट एअरवेजच्या ९ डब्ल्यू ८२५ – कोच्ची – मुंबई विमानाच्या अपहरणाचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती विमानतळाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या सीआयएसएफला देण्यात आली. सीआयएसएफच्या पथकाने त्या तरुणाला तातडीने ताब्यात घेतले आणि सर्व प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला. त्या तरुणाची चौकशी सुरु असून त्याचे नाव समजू शकलेले नाही.

‘जेट एअरवेज’ने या वृत्तावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘कोच्चीतील आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन कोच्ची – मुंबई या विमानाचे दुपारी २ वाजून ५ मिनिटांनी उड्डाण होणार होते. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव विमानाचे उड्डाण दोन तास उशिराने होणार आहे. संबंधित सुरक्षा यंत्रणांना घटनेची माहिती दिली असून आम्ही तपासात सहकार्य करु असे ‘जेट एअरवेज’ने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

दरम्यान, यापूर्वी २९ ऑक्टोबर रोजी ‘जेट’च्याच मुंबई – दिल्ली विमानात अपहरणकर्ते असून बॉम्बही ठेवण्यात आला आहे, असा मजकूर असलेली चिठ्ठी आढळल्याने खळबळ माजली होती. हे विमान तातडीने अहमदाबादमध्ये उतरवण्यात आले होते. चिठ्ठी ठेवणाऱ्या तरुणाला सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेतले होते. बिरजू सल्ला (वय ३७) असे या तरुणाचे नाव होते.