खोबऱ्याचे तेल हे नैसर्गिक प्रतिजैविक असून त्याच्या मदतीने शर्कराप्रेमी जिवाणूंना मारता येते. परिणामी या जिवाणूंमुळे दात किडण्याची  प्रक्रियाही थांबवता येते, असे नवीन संशोधनात दिसून आले आहे. वैज्ञानिकांच्या मते, खोबऱ्याचे तेल हे दातांची जिवाणूंमुळे होणारी झीज रोखते. त्याचा वापर टूथपेस्ट किंवा माउथवॉश यातही करता येईल. एन्झाइम्सनी संस्कारित केलेले खोबरेल तेल हे स्ट्रेप्टोकॉकस जिवाणूंची वाढ रोखते. हे जिवाणू शर्कराप्रेमी असतात; त्यामुळे दातांवर ते साठून त्यांची झीज होते. म्हणून गोड पदार्थ हे दातांना हानिकारक असतात.
प्रगत देशात ६० ते ९० टक्के मुलांचे दात हे गोड पदार्थ व शीतपेयांमुळे किडतात. यातील मुख्य संशोधक व आर्यलडच्या अ‍ॅथलॉन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेचे प्रा. डॉ. डॅमियन ब्रॅडी यांनी सांगितले, की सर्वसाधारणपणे दात किडण्याकडे फारसे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही, पण तो गंभीर विकार आहे. एन्झाइम (वितंचक) संस्कारित खोबरेल तेलाने जिवाणू मारले जातात. त्यामुळे टूथपेस्टमधील रासायनिक घटकांना पर्याय देता येईल. आजच्या काळात जिवाणू हे प्रतिजैविकांना जुमानत नाहीत. त्यामुळे खोबरेल तेलाचा नैसर्गिक पर्याय प्रभावी ठरू शकतो.अंशत: पचन झालेल्या दुधापासून बनवलेला एस म्युटन्स हा पदार्थ दाताच्या इनॅमलला चिकटत नाही. या अगोदरच्या संशोधनातून ब्रॅडी यांनी प्रेरणा घेतली आहे.
ब्रॅडी यांनी खोबरेल तेलाचा वापर स्ट्रेप्टोकॉकस जिवाणूंवर केला. हे जिवाणू माणसाच्या तोंडात वाढत असतात. एन्झाइम संस्कारित खोबरेल तेल हे या जिवाणूंना मारू शकते. या स्ट्रेप्टोकॉकस जिवाणूंमुळे दातांची झीज करणारे आम्ल तयार होत असते. मानवी अन्न पचनाच्या क्रियेत काही घटक असे तयार होतात जे जिवाणूंना रोखतात.