टोरांटो : सकाळच्या कॉफीचा कप हा नित्यनेमाचा भाग असला तरी त्यामुळे अल्झायमर (स्मृतिभ्रंश) व पार्किन्सन (कंपवात) हे दोन्ही रोग होण्याची जोखीम कमी होते, असा दावा वैज्ञानिकांनी केला आहे.

वैज्ञानिकांनी म्हटले आहे, की कॉफीमुळे सकाळी सकाळी ऊर्जा तर वाढतेच, पण इतरही फायदे होतात. कॉफी सेवन केल्याने अल्झायमर व पार्किन्सनचा धोका कमी होतो. कॅनडातील क्रेमबिल रीसर्च इन्स्टिटय़ूटचे डोनाल्ड विव्हर यांनी सांगितले, की कॉफीमुळे असा फायदा होण्याची कारणे शोधण्याचा प्रयत्न त्यांनी केला. वयपरत्वे मेंदूची हानी होत जाते, त्यामुळे बोधनात्मक अडचणीही निर्माण होतात. त्यात कॉफीतील कोणती संयुगे फायद्याची ठरतात हे पाहणे महत्त्वाचे होते. लाइट रोस्ट, डार्क रोस्ट व डिकॅफिनेटेड डार्क रोस्ट अशा तीन प्रकारच्या कॉफीवर प्रयोग करण्यात आले. सुरुवातीच्या प्रयोगात कॅफिन असलेल्या व नसलेल्या डार्क रोस्ट कॉफीचे परिणाम सारखेच दिसून आले, असे क्रेमबिल रीसर्च इन्स्टिटय़ूटचे रॉस मॅन्सिनी यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी नंतर वेगळ्या पद्धतीने अभ्यास केला असता कॉफीचा हा चांगला परिणाम कॅफिनमुळे नसून फेनीलिंडेन्स या घटकांमुळे असल्याचे दिसून आले. कॉफी बीन्स भाजल्यानंतर त्यात हा घटक तयार होतो. या फेनीलिंडेन्समुळे बिटी अमायलॉइड व ताऊ हे प्रथिनांचे दोन्ही प्रकार रोखले जातात. या दोन प्रथिनांचे मेंदूत थर साचून पार्किन्सन व अल्झायमर हे रोग होतात. कॉफी बीन्स भाजल्याने त्यातील फेनीलिंडेन्स वाढतात, त्यामुळे जास्त भाजलेली कॉफी ही कमी भाजलेल्या कॉफीपेक्षा जास्त परिणामकारक ठरते.