माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अमेरिकी कंपनी कॉग्निझंट टेक्नॉलॉजी सोल्युशन्स कॉर्पने व्यावसायिक पुनर्रचना आणि खर्चात कपातीच्या नियोजनानुसार, येत्या काही महिन्यांमध्ये तब्बल सात हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार असल्याचे गुरुवारी जाहीर केले. शिवाय कंपनी कंटेंट अवलोकन व्यवसायातूही बाहेर पडण्याचा विचार करीत असल्याने आणखी सहा हजार कर्मचाऱ्यांवर नोकरी गमावण्याचे गंडांतर येणार आहे.

गंभीर बाब म्हणजे नोकरी गमावणारे बहुतांश कर्मचारी हे भारतातीलच असण्याची शक्यता आहे. सप्टेंबरअखेर कॉग्निझंटच्या वेतनपटावर २,८९,९०० कर्मचारी आहेत. तर त्यापैकी कंपनीचे जवळपास दोन लाख कर्मचारी हे भारतात कार्यरत आहेत. कंपनीच्या कर्मचारी संख्येत भारताचाच मोठा वाटा असल्याने, कपातीची सर्वाधिक झळही भारतालाच बसणार आहे.

कॉग्निझंटने तिमाही निकाल जाहीर केल्यानंतर प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात या नोकर कपातीसंबंधाने तपशील दिला आहे. येत्या काही महिन्यांमध्ये जगभरातून कंपनी सुमारे १३ हजार मध्यम आणि वरिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखविणार असल्याचे यातून स्पष्ट होते.

ज्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात येईल त्यापैकी पाच हजार कर्मचाऱ्यांना नव्या कसबांचे प्रशिक्षण देऊन पुन्हा कामावर रूजू करून घेतले जाईल, असेही कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यापूर्वी मे महिन्यात खर्चात कपातीच्या नियोजनानुसार, कॉग्निझंटने कर्मचारी कपात केली होती.

तथापि जुलै ते सप्टेंबर या तिमाही कालावधीत कंपनीची कामगिरी सुधारली आहे. तसेच कंपनीचा महसूल ४.२५ अब्ज अमेरिकी डॉलरवर पोहोचला आहे. गेल्या तिमाहीत कंपनीला ४.१४ अब्ज डॉलरचा महसूल मिळाला होता. सप्टेंबर तिमाहीत कंपनीने ४७७ दशलक्ष डॉलरचा नफा कमावला आहे, अशी माहिती कॉग्निझंटचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रायन हम्फ्रीज यांनी दिली. त्यांच्याच नेतृत्वात काही दिवसांपूर्वी कंपनीचा नफा वाढवण्यासाठी व्यावसायिक पुनर्रचना प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.