सोनिया गांधी अध्यक्ष असलेल्या राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टने मुस्लिम धर्मप्रचारक झाकीर नाईक यांच्या ट्रस्टकडून देणगी घेतल्यावरून वादात अडकलेल्या काँग्रेसने आता याप्रकरणी भाजपवर पलटवार केला आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने २००३ साली झाकीर नाईक यांच्या जम्मू काश्मीर यात्रेचे आयोजन व व्यवस्था केली होती, असा आरोप काँग्रेसने केला आहे. तत्कालीन एनडीए सरकारने नाईक यांचा काश्मीरचा तीन दिवसांचा दौरा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले होते, असा आरोप काँग्रेसने केला आहे.
२००३ साली भाजप केंद्रात तर राज्यात पीडीपी-भाजप युती सरकार सत्तेवर होते. त्यावेळी झाकीर नाईकला राजभवनात बोलावण्यात आले होते. एनडीए सरकारने नाईकच्या दौऱ्याची व्यवस्था केली होती, की नाही याचे उत्तर भाजपने देण्याची मागणी काँग्रेस प्रवक्ते मनीष तिवारी यांनी केली आहे.
तिवारी म्हणाले, जम्मू काश्मीरच्या तत्कालीन राज्यपालांनी नाईकची भेट घेतली होती, हे सत्य नव्हे काय, नाईकच्या तीन दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्याची व्यवस्था एनडीए सरकारने केली होती का?, असे काही प्रश्न तिवारी यांनी उपस्थित केले आहेत. ढाका येथील दहशतवादी हल्ला झाकीर नाईकच्या प्रेरणेने केल्याचे वृत्त बाहेर येईपर्यंत नाईक हा प्रसारमाध्यमे आणि गुप्तचर संघटनांच्या रडारबाहेर होते.
त्यामुळे भाजपने दुसऱ्यांकडे बोट करण्यापेक्षा स्वत: आत्मपरीक्षण करावे. जर झाकीर नाईक आता दहशतवाद्यांशी संबंधित वाटत असीतल तर २००३ मध्ये त्यांचे संबंध नव्हते काय?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
भाजपनेही काँग्रेसच्या या आरोपांना उत्तर दिले. काँग्रेसचे हे नेहमीचेच आहे. जेव्हा ते रंगेहाथ सापडतात. तेव्हा ते पूर्वीच्या एनडीए सरकारला दोष देतात, अशी टीका भाजपचे श्रीकांत शर्मा यांनी दिली.
झाकीर नाईक यांच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशनने काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या कार्यकाळात राजीव गांधी फाउंडेशनला ५० लाख रूपयांची देणगी दिली होती. सोनिया गांधी या फाउंडेशनच्या प्रमुख आहेत. बांगलादेशची राजधानी ढाका येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दोन आरोपींनी झाकीर नाईक यांच्यापासून प्रेरित होऊन हे कृत्य केल्याचे म्हटले होते. त्यानंतर नाईक आणि त्यांच्या स्वंयसेवी संस्था गुप्तचर संस्थांच्या निगराणीखाली आल्या.