तामिळनाडूतील कोईम्बतूर या ठिकाणी असलेल्या एका रुग्णालयात महिलेच्या पोटातून ३३.५ किलोंचा ट्युमर काढण्यात आला आहे. या महिलेचे नाव वसंता असून ती उटी येथील शेतमजूर आहे. तिने ट्युमरमुळे वाढणाऱ्या पोटाकडे दुर्लक्ष केले आणि हा ट्युमर चक्क ३३.५ किलो इतका भला मोठा झाला. तिला वेदना झाल्या की ती तात्पुरता इलाज करत असे. तिला जास्तच वेदना होऊ लागल्याने तिच्या विविध चाचण्या करण्यात आल्या आणि त्यानंतर उटी येथील डॉक्टरांनी तिला मोठ्या रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला.

ज्यानंतर ही महिला कोइम्बतूर येथील रुग्णालयात दाखल झाली. तिथे तिच्यावर शस्त्रक्रिया करून तिच्या पोटातून ३३.५ किलोंचा ट्युमर बाहेर काढण्यात आला. मला असह्य वेदना होऊ लागल्या होत्या. पोटाचा आकार इतका वाढला होता की मला चालताही येणे कठीण झाले होते. त्यानंतर मी रूग्णालयात दाखल झाले आणि मग माझ्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. सेनथील कुमार, डॉ. पियुष, डॉ. अनिता आणि डॉ. सतीश कुमार या सगळ्यांनी तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली.

आम्ही तिला होणाऱ्या वेदना पाहिल्या. तिच्या चाचण्या केल्यावर आम्हाला ट्युमर मोठा आहे हे लक्षात आले. या महिलेला ट्युमरमुळे चालणे आणि श्वास घेणेही कठीण होऊन बसले होते. शस्त्रक्रिया केली तर मला काही होणार नाही ना अशी भीती तिला वाटत होती. मात्र आम्ही तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करून तिच्या पोटातून ट्युमर बाहेर काढला असे डॉ. सेनथील कुमार यांनी सांगितले. या ट्युमरने तिच्या पोटाचा बराचसा भाग व्यापला होता. त्यामुळे तिला प्रचंड वेदना होत होत्या आणि तिच्या रक्तवाहिन्यांवरही याचा परिणाम झाला होता असेही डॉक्टरांनी स्पष्ट केले.

आम्हाला शस्त्रक्रिया करताना एक महत्त्वाची काळजी घ्यायची होती की वसंताचा कमीत कमी रक्तस्त्राव होईल. जी आम्ही आमच्या परिने पूर्णपणे घेतली. आम्हाला हा ट्युमर बाहेर काढण्यासाठी तीन तासांचा अवधी लागला असेही डॉक्टर कुमार यांनी सांगितले. एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

३३.५ किलोचा ट्युमर एखाद्या रूग्णाच्या पोटातून काढण्याची ही पहिलीच वेळ आहे. ३३.५ किलोच्या ट्युमरमुळे महिलेचे वजन ७५ किलोंच्या घरात गेले होते. याआधी दिल्ली आणि पुद्दुचेरी येथील एम्स रूग्णालयात ट्युमरच्या ज्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या त्यामध्ये २० किलोंचा ट्युमर काढण्यात आला आहे. मात्र ३३.५ किलोंचा ट्युमर काढण्याची ही पहिलीच वेळ आहे असेही डॉक्टरांनी सांगितले.