उत्तर प्रदेशात थंडीची लाट कायम असून थंडीमुळे आणखी ९ जणांचा बळी गेला आहे. आतापर्यंत थंडीच्या कहरामुळे बळींची संख्या ११६ वर पोहचली आहे. राज्यातील नजिबाबादला सर्वात कमी म्हणजेच २.४ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. राज्यात बहुतेक ठिकाणी धुक्याचे साम्राज्य असून सूर्यदर्शनही दुरापास्त झाले आहे. तर पश्चिम उत्तर भागत ५ ते ११ अंश तापमान आहे. तर अहलाबाद, फिरिजाबाद, मुराराबाद, आग्रा, मेरठ, कानपूर, लखनऊ, बरेली आदी भागात रात्री नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे.
दल सरोवर गोठले
काश्मीर खोऱ्यात थंडीचा कडाका कायम असून येथील प्रसिद्ध दल सरोवर यंदाच्या मोसमात प्रथमच गोठले आहे. श्रीनगरमध्ये बुधवारी रात्री सर्वात कमी म्हणजे उणे चार अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. या मोसमात दुसऱ्यांदा तापमान नीचांकी झाले असून, २३ डिसेंबरलाही उणे चार अंश तापमान होते. तर कारगिलमध्येही थंडीचा कहर कायम असून राज्यातील सर्वात कमी म्हणजे उणे १६.२ अंश तापमानाची तेथे नोंद झाली आहे. हेलमध्येही उणे १६ अंश तापमान होते. उत्तर काश्मीरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले गुलमर्ग येथेही उणे ९ अंश तापमानाची नोंद झाली आहे. याशिवाय दक्षिण काश्मीरमधील पेहलगाम येथे ७.८ अंश, काजीगुंड भागात उणे ५ अंश तापमान नोंदले गेले आहे. या थंडीचा कडाका  आणखी काही दिवस जाणवणार असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले.