संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अभिभाषणानंतरच्या चर्चेत बोलताना काँग्रेसचे खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी नोटाबंदीच्या मुद्यावरुन पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधला. ‘टिव्हीवर एका शीतपेयाची जाहिरात येते. त्यामधील अभिनेता आज कुछ तुफानी करते है, असे म्हणतो. पंतप्रधान मोदींनी याच जाहिरातीपासून प्रेरणा घेत नोटाबंदीचा निर्णय घेतला,’ असा टोला ज्योतिरादित्य सिंधिया यांनी लगावला.

काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनीदेखील पंतप्रधान मोदी आणि भाजपवर घणाघाती हल्ला चढवला. ‘नोटाबंदीमुळे कोट्यवधींच्या डोळ्यामध्ये पाणी आणणाऱ्या सरकारने आता त्या जनतेच्या चेहऱ्यावर हास्य आणायला हवे,’ असे खर्गे यांनी म्हटले. ‘लोकशाहीचे रक्षण केल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी काँग्रेसचे आभार मानायला हवेत. देशातील लोकशाहीमुळेच नरेंद्र मोदी यांच्यासारखी एका गरिब घरातून आलेली व्यक्ती देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होऊ शकली,’ अशा शब्दांमध्ये खर्गे यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला.

काँग्रेसने सत्तर वर्षांमध्ये काय केले, या पंतप्रधान मोदींच्या प्रश्नाचा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी समाचार घेतला. ‘देशात हरितक्रांती तुम्हीच आणलीत, असे मला वाटते. यासोबतच तुमच्या गुजरातमध्ये धवल क्रांतीदेखील तुम्हीच आणलीत,’ अशा उपरोधिक शैलीत खर्गे यांनी मोदींवर जोरदार टीका केली. ‘मनरेगा योजना राबवण्यात सरकार अपयशी ठरले आहे. ग्राम विकास मंत्र्यांना अरुण जेटलींकडे निधी मागण्यासाठी जावे लागते,’ अशा शब्दांमध्ये खर्गे यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.