लडाखमध्ये सध्या थंडीचा कहर झाला असून यापासून बचावासाठी चीनच्या १०,००० सैनिकांनी वास्तविक नियंत्रण रेषेजवळील (एलएसी) खोलीवरील भागातून माघार घेतली आहे. सध्या या भागात भारत-चीन दरम्यान तणावाची स्थिती आहे. भारतीय हद्दीजवळ असलेल्या चीनच्या पारंपारिक प्रशिक्षण भागातून हे सैन्य मागे हटल्याने सध्या हा भाग रिकामा झाला आहे. इंडिया टुडेने बड्या सरकारी सुत्रांच्या हवाल्याने याबाबत वृत्त दिलं आहे.

गेल्या वर्षी मार्च-एप्रिल दरम्यान संपूर्ण जग करोना महामारीचा सामना करत असताना या संधीचा फायदा घेत चीनने पुन्हा एकदा आपलं विस्तारवादी रुप दाखवत लडाखमध्ये भारतीय हद्दीजवळ ५०,००० सैनिकांना तैनात केलं होतं.

दरम्यान, या भागातील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनी सैनिकांमध्ये संघर्षही झाला होता. तेव्हापासून अद्यापपर्यंत या भागात तणावाचे वातावरण आहे. मात्र, निसर्गापुढे चीनी सैनिकांनी हार मानली असून गोठवणाऱ्या थंडीपासून बचावासाठी ते भारतीय हद्दीपासून सुमारे २०० किमी मागे हटले आहेत.

गलवान खोऱ्यातील १५ जून रोजी झालेल्या संघर्षादरम्यान भारतानं आपले २० जवान गमावले होते. यामध्ये चीनचे सैनिकही मारले गेले होते. मात्र, चीनने किती सैनिक मारले गेले किंवा जखमी झाले याचा आकडा जाहीर केलेला नाही. याघटनेनंतरही चीनने आपला आक्रमक पवित्रा सोडला नसून अधूनमधून त्याच्या भारतावर कुरघोड्या सुरुच असतात.