जम्मू-काश्मीरमधील थंडीची लाट गुरुवारीही कायम होती. किमान तापमान गोठणबिंदूपेक्षा अनेक अंशांनी कमी होते.

जम्मू-काश्मीरची उन्हाळी राजधानी असलेल्या श्रीनगर शहरात किमान तापमान उणे ७ अंश सेल्सिअस होते. आदल्या रात्री येथे उणे ६ अंश तापमानाची नोंद करण्यात आली होती आणि ते या दिवसांतील सामान्य तापमानापेक्षा सुमारे ५ अंशांनी कमी होते, असे वेधशाळेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्य़ातील गुलमर्ग स्कीइंग रिसॉर्ट येथे बुधवारी रात्री उणे ७.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले यापूर्वीच्या रात्री ते उणे ६.५ अंश सेल्सिअस होते.

दक्षिण काश्मिरातील वार्षिक अमरनाथ यात्रेसाठी ‘बेस कँप’ असलेल्या पहलगाम या पर्यटनस्थळी आदल्या रात्री असलेले उणे ८.३ अंश सेल्सिअस तापमान घटून बुधवारी रात्री उणे ९.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. काश्मीर खोऱ्याचे प्रवेशद्वार असलेल्या काझीगुंड येथे उणे ८.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

उत्तर काश्मीरमधील कुपवाडा येथे उणे ५.९ अंश सेल्सिअस, तर कोकरनाग येथे उणे ६.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

हाडे गोठवणाऱ्या थंडीमुळे काश्मीर खोऱ्यातील अनेक जलाशय गोठले आहेत. श्रीनगर शहरातील, तसेच खोऱ्यातील इतर शहरांमधील अनेक रस्त्यांवर बर्फाचा जाड थर पसरला आहे.

पंजाब, हरियाणातही तापमानात घट

पंजाब व हरियाणा या राज्यांत  गेले काही दिवस तापमान सरासरीपेक्षा वाढल्यानंतर गुरुवारी किमान तापमान घसरल्यामुळे थंडी पुन्हा परतली आहे. पंजाबमधील अमृतसर येथे ३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. आदमपूर व पठाणकोट येथे अनुक्रमे ३.५ अंश व ४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. हरियाणातील नरनौल येथे ४.६ अंश सेल्सिअस तापमान होते. हिसार येथे ६.७ अंश, तर भिवानीत ६.२ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. चंडीगडमधील तापमान ७.२ अंश सेल्सिअस होते.