हिमालयाच्या पर्वत रांगांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बर्फवृष्टी होत असल्याने आणि तापमानात मोठ्या प्रमाणावर घट झाल्याने त्याचा परिणाम संपूर्ण उत्तर भारतात जाणवत आहे. आज आणि उद्या येथे तापमानात कमालीची घट होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दरम्यान, दिल्लीत गेल्या २२ वर्षातील सर्वांत जास्त थंडी सध्या जाणवत आहे. तर उत्तर प्रदेशात मंगळवारी एकाच दिवसात २८ लोकांचा कडाक्याच्या थंडीने मृत्यू झाला आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, २५ आणि २६ डिसेंबर रोजी उत्तर भारतातील तापमानात प्रचंड घट होणार असून या काळात वातावरणात गडद धुके राहण्याची शक्यता आहे. दिल्लीतील विविध भागात जास्तीत जास्त ४.५ डिग्री तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे दिल्ली शहर गेल्या २२ वर्षातील सर्वात कमी तापमानाचा सामना करीत आहे. हरयाणाच्या नारनौल भागात सध्या १.७ डिग्री तापमानाची नोंद झाली आहे. डोंगराळ भागात लडाखच्या द्रासमध्ये -२६.७ डिग्री तापमान, दिल्लीतील पालम येथे ७.२ डिग्री, सफदरजंगमध्ये ८.३ इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे.

गोठवून टाकणारी थंडी आणि धुक्यामुळे उत्तर प्रदेशात मंगळवारी २८ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच येथील बहराइच येथे ४ डिग्री सेल्सिअस इतके तापमान होते. तसेच इतर काही शहरांमध्ये पारा २ ते ७ डिग्रीपर्यंत खाली घसरला. पहाटे आणि रात्री इथे धुक्यामुळे दृश्यता प्रमाण हे २०० मीटर इतके नोंदवण्यात आले आहे.

बुंदेलखंड आणि मध्य उत्तर प्रदेशात थंडीमुळे १७ जणांचा मृत्यू झाला. एकट्या कानपूर शहरात १०, फतेहपूर, औरेया आणि कानपूरमध्ये प्रत्येकी दोन जणांचा मृत्यू झाला. तसेच थंडीमुळे एका वृद्ध महिलेने आपले प्राण सोडले. प्रतापगडमध्ये थंडीने एकाचा मृत्यू झाला आहे. लालगंजमध्ये धुक्यामुळे दोन ट्रकची समोरा समोर धडक होऊन त्यात चालकाचा मृत्यू झाला. प्रयागराजमध्ये एक वृद्ध महिला आणि शेताची राखण करणाऱ्या दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.