दिल्ली विद्यापीठाच्या हंसराज या महाविद्यालयाने आपल्या वसतिगृहांच्या खोल्या आणि बेड्स करोना रुग्णांसाठी आयसीयू म्हणून वापरण्यास तयारी दर्शवली आहे. त्याचबरोबर महाविद्यालयात टेस्टिंग सेंटर आणि लसीकरण केंद्रही सुरु करण्यास आपली हरकत नसल्याचं महाविद्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.

या महाविद्यालयाचे प्राचार्य रमा यांनी नायब राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री तसंच जिल्हाधिकारी यांना यासंदर्भातलं पत्र दिलं आहे. त्या म्हणाल्या, “आम्ही आमच्या बाजूने तीन पर्याय दिले आहेत, कोविड केअर सेंटर, आरटीपीसीआर टेस्ट सेंटर आणि लसीकरण केंद्र. आम्ही अद्यापही उत्तराच्या प्रतिक्षेत आहोत. आमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, आम्हाला वैद्यकीय उपकरणांची गरज लागेल.”

९ मे रोजी लिहिलेल्या पत्रात रमा म्हणतात, “आपण सर्वच जण वाईट परिस्थितीतून जात आहोत. या महामारीमुळे सर्वांसमोर मोठी आव्हाने उभी ठाकली आहेत. सर्वांनी पुढे येत आपल्या पद्धतीने या महामारीसोबत लढायला हवं.”

“हंसराज महाविद्यालयातल्या वसतिगृहात २०० जण राहू शकतात. आम्ही तुमच्या मदतीने या वसतिगृहाचे रुपांतर आयसीयू बेड असलेल्या करोना सेंटरमध्ये करण्यास तयार आहोत. रुग्णांना बेड उपलब्ध न होणं हे विचलित करणारं आहे. महाविद्यालयाचे कर्मचारी आणि त्यांच्या परिवारालाही अशा समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. दररोज आढळणाऱ्या बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.”