कर्नाटक पोलिसांनी पाच तरुणांना कॉलेज विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. फेब्रुवारी महिन्यात हा बलात्कार करण्यात आला होता. मंगळवारी काही व्हॉट्सअॅप ग्रुपवर बलात्काराचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. बलात्काराचा व्हिडीओ सोशल मीडियार व्हायरल होत असल्याची माहिती सोशल मीडिया सेलने देताच तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस अधिक्षक बी लक्ष्मी प्रसाद यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, माहिती मिळताच आम्ही सुओ मोटो केस दाखल केली. व्हिडीओ किती प्रमाणात शेअर झाला आहे हे तपासणं महत्त्वाचं होतं. आम्ही लोकांना हा व्हिडीओ शेअर करु नका अथवा आपल्या मोबाइल किंवा संगणकात सेव्ह करु नका असं आवाहन केलं. तसं करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित कलमांतर्गंत गुन्हा दाखल करण्यात येईल असंही बजावलं’.

पीडित विद्यार्थिनीची ओळख पटली असून तिने दिलेल्या माहितीच्या आधारे पाच तरुणांना अटक करण्यात आली. यामध्ये तिच्या एका सीनिअरचाही समावेश आहे. पीडित तरुणीवर बलात्कार करण्याआधी तिला गुंगीचं औषध दिलं गेल्याचा आरोप असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ‘आरोपी सध्या कोठडीत आहेत. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात येईल’, असं बी लक्ष्मी प्रसाद यांनी सांगितलं आहे.