श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे रविवारी झालेल्या आठ बॉम्बस्फोटांच्या मालिकेनंतर कोलंबोच्या मुख्य विमानतळाजवळही एक पाईप बॉम्ब आढळून आला. दरम्यान, वेळेत तो निष्क्रिय करण्यात आल्याने आणखी धोका टळला. तत्पूर्वी झालेल्या स्फोटांच्या मालिकेत २१५ लोकांचा मृत्यू झाला असून ५०० जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी १३ संशयीतांना ताब्यात घेण्यात आले आहे. एएफपी या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने स्थानिक पोलिसांच्या हवाल्याने याबाबत वृत्त दिले आहे.


एएफपीच्या माहितीनुसार, कोलंबो विमानतळाच्या मुख्य टर्मिनलजवळील रस्त्याच्या बाजूला रविवारी हाताने बनवलेला पाइप बॉम्ब आढळून आला. त्यानंतर पाचारण करण्यात आलेल्या बॉम्ब नाशक पथकाने मोठ्या सुरक्षा व्यवस्थेसह तो बॉम्ब निष्क्रिय केला. दरम्यान, श्रीलंकेच्या हवाई दलाचे प्रवक्ते ग्रुप कॅप्टन गिहान सेनेविरत्ने यांनी दावा केला की, साखळी बॉम्ब स्फोटात वापरण्यात आलेले आयईडी हे स्थानिक ठिकाणीच बनवण्यात आले होते.


दरम्यान, रविवारी (दि.२१) रात्री शहरात सर्वत्र लावण्यात आलेली संचारबंदी आज (दि.२२) पहाटे सहा वाजता उठवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे करता येणार आहेत.

ईस्टर संडेनिमित्त झालेल्या गर्दीचा फायदा घेऊन कोलंबोतील तीन चर्च आणि तीन हॉटेलांमध्ये रविवारी सकाळी साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले. त्यानंतर दुपारी इतर दोन ठिकाणी स्फोट झाले. यामध्ये ३५ परदेशी नागरिकांपैकी ३ भारतीयांचा मृत्यू झाला आहे.